

हिंदूंमधील शौर्य व सामर्थ्य वाढवण्यासाठीच गदापूजन ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
रायगड – अयोध्येत स्थापन झालेले श्रीराममंदिर ही एकप्रकारे रामराज्याची सुरुवात असून आता रामराज्य सर्वत्र स्थापन व्हावे आणि हिंदू समाजातील शौर्य जागृत होण्यासाठी आज श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्या सहभागाने देशभरात ५०० ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. रायगड जिल्ह्यातही २४ ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम घेण्यात आले. रायगड जिल्ह्यात पनवेल, खोपोली, अलिबाग, नागोठणे, पाली या ठिकाणी हे कार्यक्रम संपन्न झाले. यात विशेषत: युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला.

या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ३ वर्ष सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला.
या ‘गदापूजना’मागील भूमिका स्पष्ट करताना हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी म्हणाले, मारुतीरायांची ‘गदा’ हे केवळ युद्धातील अस्त्र नव्हे, तर ती धर्मरक्षणाचा संकल्प, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतिक आहे. आज अयोध्येत श्रीरामलल्ला विराजमान झाले आहेत, हा एक ऐतिहासिक क्षण आहे, पण श्रीरामाचे कार्य अजून अपूर्ण आहे. मंदिर उभारले, आता रामराज्य घडवण्याचे दायित्व आपल्या सर्वांवर आहे. हे कार्य हनुमानासारखे शौर्य, निष्ठा, त्याग आणि सामर्थ्य यांच्याशिवाय शक्य नाही. म्हणूनच या वर्षीही देशभरात गदापूजनाच्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत करण्याचा आणि रामराज्याच्या दिशेने सामूहिक वाटचाल करण्याचा निर्धार करायचा आहे’.




Be First to Comment