Press "Enter" to skip to content

नवी दिल्ली येथे पार पडली ‘ग्रामीण आर्थिक परिषद’

‘सात्त्विकता व धर्माचरणा’विना शाश्वत विकास अशक्य ! – दिल्लीतील परिषदेत संशोधन मांडले

प्राचीन भारतीय धर्मशास्त्रांतील ‘सात्त्विकता’, धर्माचरण, भारतीय गायीचे महत्त्व आणि नामजप हेच खर्‍या अर्थाने शाश्वत विकासाचे मुख्य घटक आहेत. केवळ पर्यावरणपूरक तंत्रज्ञान नव्हे, तर अध्यात्मिक शुद्धतेवर आधारित विचारसरणीशिवाय मानवी जीवन आणि पृथ्वीचे भविष्य सुरक्षित राहणार नाही, असे संशोधन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्रामीण आर्थिक परिषदे’त(‘रूरल इकॉनॉमिक फोरम’मध्ये) मांडण्यात आले. या संशोधनाचे सादरीकरण श्री. शॉन क्लार्क यांनी केले असून त्याचे मार्गदर्शक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आहेत.

या परिषदेत विविध देशांतील प्रतिनिधींनी या संशोधनाचे कौतुक केले. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री श्री. गिरीराज सिंग यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रयत्नांचे, तसेच ‘भारतातील समृद्ध आध्यात्मिक संसाधनांच्या साहाय्याने प्रतिबंध आणि उपायाभिमुख आरोग्य व्यवस्था विकसित करणे आणि त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होणारा लाभ’ यावरील संशोधनाचे कौतुक केले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आतापर्यंत ११८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले असून त्यापैकी १४ परिषदांमध्ये ‘सर्वोत्तम सादरीकरण’ पुरस्कार मिळवले आहेत.

औद्योगिक क्रांतीपासून आजवर विकासाच्या मार्गात पर्यावरणाचा विचार फारसा झाला नाही. ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना वर्ष १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत मांडली गेली खरी; पण ५० वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही. आजच्या पर्यावरणीय संकटांची कारणे मानवी मनोवृत्तीत असलेल्या असात्त्विकतेत आहेत. म्हणूनच ‘विकास’ ही केवळ भौतिक संकल्पना न राहता ती आध्यात्मिकदृष्ट्याही सात्त्विक असली पाहिजे, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.

‘जीडीव्ही बायोवेल’ या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या एका प्रयोगात असे लक्षात आले की, आंघोळीच्या पाण्यात गोमूत्राचे काही थेंब घातल्यावर व्यक्तीच्या देहातील सप्तचक्रे ६५ ते ७८ टक्के संतुलितरित्या कार्यरत होतात, तर गोमूत्राचे काही थेंब प्राशन केल्यावर ती ९० टक्के संतुलितरित्या कार्यरत होतात. गायीच्या उपस्थितीमुळे परिसरातील सकारात्मक स्पंदने २२ टक्क्यांनी वाढतात. गोमूत्राच्या वापरातून त्वचारोगावर आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे गायीपासून मिळणारी उत्पादने ही ग्रामीण भारतासाठी समृद्धीची गुरुकिल्ली ठरू शकतात.



अनेक विकार आणि व्यसनाधीनता यांचा उगम अध्यात्मिक कारणांमुळे असतो हे संशोधनातून अधोरेखित झाले. ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपामुळे व्यसनमुक्ती, मानसिक स्थैर्य आणि प्रारब्धजन्य विकारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. ३ मास नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यामुळे २० वर्ष जुना एक्झिमा (त्वचा रोग) फक्त नामजपाने बरा झाल्याचे उदाहरण या वेळी देण्यात आले. एकूणच अध्यात्मशास्त्रानुसार सध्या जगात पर्यावरणातील पालट आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम टाळण्यासाठी केले जाणारे उपाय हे वरवरचे आहेत. जगात असात्त्विकता वाढल्याने त्याचा विपरित परिणाम संपूर्ण विश्वाच्या हवामानाचे संचलन करणार्‍या पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर होतो. वातावरणातील सात्त्विकता वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे साधना करणे होय. तर भारत हा खर्‍या अर्थाने ‘आत्मनिर्भर भारत’ बनेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.