

श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट आयोजित रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद
पनवेल : प्रतिनिधी
श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट चे वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये तब्बल १०१ रक्त पिशव्यांचे संकलन करत रक्तदात्यांची सेंचुरी साजरी करण्यात आली. प्रतिवर्षी चार रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे हे २६ वे रक्तदान शिबीर होते.आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवत रक्तदान शिबिराच्या आयोजनाची प्रशंसा केली.
कोरोना कालखंडामध्ये रक्ताची चणचण भासत होती. रक्तदाते मिळवण्यासाठी रुग्णांच्या आप्तेष्टांना हेलपाटे मारावे लागत होते. या गोष्टीची गंभीर्याने दखल घेत ऍड मनोहर सचदेव यांच्या पुढाकाराने श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट आणि श्री पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याच्या प्रथेस प्रारंभ केला. त्यानंतर सलग २६ रखदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. सदर रक्तदान शिबिराला विद्यार्थी वाहक संस्था पनवेल, आम्ही रक्तदाते पनवेलचे, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि नवी मुंबई प्रिंट अँड डिजिटल जर्नालिस्ट असोसिएशन यांचे सहकार्य लाभले.


पनवेलच्या विश्राळी नाका येथील सिंधी पंचायत ट्रस्ट सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे संपूर्ण वातानुकूलित सभागृहात रक्तदान संपन्न झाले. यावेळी सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांची इ सी जी तसेच रक्त शर्करा तपासणी देखील करण्यात आली. प्रत्येक रक्तदात्यास प्रेमपूर्वक भेट आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी एड.मनोहर सहदेव, एड. अमोल साखरे, पांडुरंग हुमणे, राजू सचदेव आदींनी अथक परिश्रम घेतले. सदर शिबिरामध्ये समाजसेविका इंदूमति ठक्कर यांच्या माध्यमातून अवयव दानाचा प्रसार व प्रचार करण्यात येत होता. तसेच इच्छुक अवयव दात्यांचे ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्यात येत होते.पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे खजिनदार संजय कदम यांनी रक्तदान करत अभिनव उपक्रमास शुभेच्छा दिल्या. त्यांनी तसेच मंचाचे अध्यक्ष मंदार दोंदे, सल्लागार विवेक मोरेश्वर पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील आदींनी ऍड मनोहर सचदेव व त्यांच्या टीमचे भेटवस्तू देऊन कौतुक केले.सुप्रसिद्ध शल्य विशारद डॉ रमेश पटेल यांच्यासह अनेक दिग्गजांनी रक्तदान शिबिरात उपस्थिती दर्शवत आयोजकांची प्रशंसा केली.
आयोजकांच्या वतीने दर तीन महिन्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते असे ऍड मनोहर सचदेव यांनी सांगितले तसेच आगामी रक्तदान शिबिर याच ठिकाणी १३ जुलै रोजी संपन्न होईल अशी घोषणा केली.




Be First to Comment