Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र राजभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

‘पधारो म्हारो देस : राज्यपालांकडून रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप

पनवेल (प्रतिनिधी) देशातील लोकांमध्ये एकी नसल्यामुळे विदेशी शासकांनी आपल्यात फूट पडून देशावर अनेक शतके राज्य केले.  राज्यांनी परस्परांच्या संस्कृती परंपरेचा आदर केल्यास लोकांमधील एकात्मता वाढेल व सर्वांनी एकदिलाने राष्ट्रासाठी योगदान दिल्यास ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ निर्मितीचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत केले.

राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थान आणि ओडिशा या दोन राज्यांचा राज्य स्थापना दिवस महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे संयुक्तपणे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लोकनृत्य व लोकगीतांच्या माध्यमातून राजस्थान व ओडिशा राज्यांच्या संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवनातर्फे या राज्य स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. 

        या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट तथा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

         अवघ्या काही हजार ब्रिटिशांनी देशातील लोकांमध्ये फूट पाडून करोडो लोकसंख्या असलेल्या आपल्या देशावर अनेक दशके राज्य केले. आगामी काळात प्रगतीची शिखरे सर करण्यासाठी देशात एकात्मता टिकून राहणे आवश्यक असून एकतेमुळे देशाचे जगातील स्थान उंचावले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. राजस्थान व ओडिशा राज्यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात देखील महत्वाचे योगदान आहे. ओडिशाचे सुपुत्र शेलेंद्र यांनी इंडोनेशियातील जावा, सुमात्रा येथवर राज्यविस्तार केला होता. ओडिशात जन्मलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे  स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान अनन्यसाधारण होते असे सांगून एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमामुळे देशातील लोकांना इतर राज्यातील महान नेत्यांचे योगदान समजण्यास मदत होत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

      याप्रसंगी दोन्ही राज्यांचा इतिहास, सौंदर्य, वारसा, कला संस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे लघुपट दाखवण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राजस्थानी लोकगीते केसरिया आणि झिरमीर बरसे आणि लोकनृत्य चिरामी, घूमर आणि कालबेलिया सादर केले. राजस्थानी राज्यगीत ‘पधारो म्हारो देस’ ने उपस्थितांची माने जिंकली. तसेच, ओडिशातील लोकगीते संबलपुरी गीत- ‘रसरकेली बो’ आणि लोकनृत्य – संभलपुरी ढलकाई सादर करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवी तसेच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.