

सुलेखनकार अच्युत पालव आणि ज्येष्ठ पत्रकार मनोज जालनावाला यांचा हृदय सत्कार
नवी मुंबई/प्रतिनिधी दि. ४ एप्रिल
बेलापूर सी बी डी येथे एन्जॉय को वर्किंग स्पेस आणि सिटी बेल मिडिया हाऊस यांच्यावतीने सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री किताब मिळाल्याबद्दल तर ज्येष्ठ पत्रकार मनोज जालनावाला यांची कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.यावेळी टाइम्स वृत्त समूहाचे सीनियर असिस्टंट एडिटर चित्तरंजन टेंभेकर,सिडको चे सामाजिक सेवा अधिकारी संतोष पळशीकर आणि सहाय्यक सामाजिक सेवा अधिकारी दीपा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.



मॉडर्न ऑफिस कल्चरची परिभाषा अधोरेखीत करणारे एन्जॉय को वर्किंग स्पेस आणि करेक्ट न्यूज! न्यूट्रल व्ह्यूज!! अशी ख्याती असणारे सिटीबेल मिडिया हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर रेल्वे वाणिज्य संकुलातील टॉवर क्रमांक सात येथे पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यामध्ये दोन दिग्गजांचा शुक्रवार दिनांक ४ एप्रिल रोजी सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी सुलेखन हा एक वैशिष्ट्यपूर्ण आर्ट फॉर्म आहे हे बिंबवण्यासाठी गेली पाच दशके अथक परिश्रम घेतलेले आहेत. सुलेखनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वकर्तुत्वाची छाप उमटविणारे ते भारतातील पहिलेच सुलेखनकर आहेत. सत्कारानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी त्यांचा सुलेखन प्रवास अत्यंत ओघवत्या शैलीत विशद केला. सुलेखनाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता संपूर्ण भारतभर भ्रमण करत त्यांनी विविध भाषा आणि लिपी यांचे सखोल अध्ययन केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सरकारच्या वतीने नुकताच त्यांना “पद्मश्री” सन्मान बहाल केल्याची घोषणा करण्यात आली.

ज्येष्ठ पत्रकार मनोज जालनावला यांची कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.परखड पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असणारे मनोज जालनावाला यांचा अनुभव अतिशय दांडगा आहे.योग्य पदावर योग्य व्यक्तीची निवड झाल्याची भावना समस्त पत्रकार विश्वातून उमटत आहे. सत्कारानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आल्याने आनंद द्विगुणित झाला असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.एन्जॉय को वर्किंग स्पेस आणि सिटी बेल मिडिया हाऊस यांच्यावतीने संचालक वैभव सोनटक्के, समूह संपादक विवेक पाटील आणि समूह संपादक मंदार दोंदे यांनी सत्कार सोहळ्याचे नियोजन केले होते. या सत्कार समारंभाला डॉक्टर मेहुल दवे,सनदी लेखापाल प्रवीण जैन,सुहास सोनटक्के, पत्रकार मच्छिंद्र पाटील, पत्रकार विक्रम गायकवाड,समृद्धी वाणी आदींची सन्माननीय उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.




Be First to Comment