Press "Enter" to skip to content

मंदिरासह सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराचा विकास करण्याची मागणी !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दरमहा ५० हजार रुपये देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश !

क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये खर्च होत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी तुटपुंजे अर्थसाहाय्य हा अन्याय आहे, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. या मागणीवर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महसूल विभागाच्या सचिवांना (श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी) दरमहा ५० हजार रुपये निधी वाढवून देण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे लिखित आदेश दिले. तसेच महसूल विभागाच्या सचिवांना दूरध्वनी करून मंदिरासाठी दरमहा २५० रुपयांऐवजी ५० हजार रुपये देण्याचे स्पष्ट आदेशही दिले. या वेळी शासनाची मदत मिळण्याआधी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तातडीने वैयक्तिकरित्या महाराजांच्या मंदिरासाठी ५० हजार रुपयांचे साहाय्य करून एक चांगला पायंडाही पाडला. तसेच त्यांनी नियमितपणे मंदिरासाठी निधी घेऊन जाण्यासही सांगितले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

या प्रसंगी समितीच्या वतीने श्री. सतीश सोनार, श्री. रवि नलावडे आणि नांदेड येथील शिवसेनेचे आमदार श्री. आनंद बोंडारकर उपस्थित होते. केंद्रात काँग्रेस सरकारच्या काळात वर्ष २०१२ पासून क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी निधी देणे सुरू करण्यात आले होते. नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाने औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी ६.५० लाख रुपयांहून अधिक निधी खर्च केला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करता औरंगजेब हा एक क्रूर आक्रमक होता. त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करून निर्घृण हत्या केली. असा आक्रमक आदरास पात्र नाही आणि त्याच्या कबरीच्या देखभालीसाठी निधी खर्च करणे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारे आहे. त्यामुळे हा निधी सरकारने बंद करावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी समितीने केली.

शिवप्रेमींसाठी सिंधुदुर्ग किल्ल्याचा विकास करा !

छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत: मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे एकमेव आणि प्राचीन मंदिर आहे. त्यामुळे येथे लाखो शिवप्रेमी आणि पर्यटक येतात. किल्ल्यावर बोटीने यावे लागते. त्यामुळे येणार्‍या पर्यटकांची योग्य सोय करणे आवश्यक आहे. किल्ला मोठा असल्यामुळे झाडी-झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्या हटवून किल्ल्याचे सुशोभीकरण करणे, परिसरात सुंदर बगीचा तयार करणे, पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह आणि गोड्या पाण्याच्या विहिरीचे सुशोभीकरण करणे यांसारखी अनेक विकास कामे तातडीने व्हावीत, अशी मागणी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.