
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अलिबाग महिला आघाडीचे अलीबागचे तहसीलदारांना निवेदन
अलिबाग, दि.२२ (प्रतिनिधी) :
लाडकी बहीण योजनेचे मासिक अनुदान १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीच्या घटकपक्षांनी विधानसभा निवडणूक दरम्यान दिले होते. या भूलथापेला बळी पडून महिलांनी महायुतीच्या बाजूने मतदान केले. मात्र प्रत्यक्षात निवडणूक पार पडून ४ महिने उलटले तरीही अनुदानात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे महायुतीने आपल्या वचननाम्यात दिलेल्या अश्वासनाप्रमाणे लाडकी बहिण योजनेचे अनुदान २ हजार १०० रुपये करुन, लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अलिबाग महिला आघाडीने केली आहे. या मागणीचे निवेदन अलीबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येते. यानंतर विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीमधील घटकपक्षांनी आपले सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचे अनुदान २ हजार १०० रुपये करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाला भुलून महिलांनी महायुतीच्या बाजूने मतदान केले असल्याचे बोलले जाते. मात्र निवडणूक संपून चार महिने उलटले तरी लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाढविण्यात आले नाही. यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अलिबाग महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. तत्काळ लाडकी बहीण योजनेचे अनुदान २ हजार १०० रुपये करुन ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अलिबाग मुरूड विधानसभा संघटिका तनुजा पेरेकर, अलिबाग तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, युवतीसेना अलिबाग तालुका अधिकारी दर्शना वाकडे, अलिबाग उपतालुका संघटिका वंदना पाटील, चौल विभाग संघटिका शिल्पा ठाकूर, मापगाव विभाग संघटिका निवेदिता गावंड, मापगाव उपविभाग संघटिका तृप्ती जावकर उपस्थित होत्या.

Be First to Comment