Press "Enter" to skip to content

गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन!

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त…संत-महंत, मंत्री यांच्यासह २० हजारांहून अधिक साधक-धर्मनिष्ठ उपस्थित रहाणार !

पणजी (गोवा) – समस्त मानवजातीच्या परम कल्याणासाठी, तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव सोहळा आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव १७ ते १९ मे २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या भव्य महोत्सवासाठी देशभरातून अनेक संत-महंत, मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांतील मंत्री, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, विचारवंत, अधिवक्ता, उद्योजक, संपादक आदी मान्यवरांसह २० हजारांहून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पणजी येथील हॉटेल मनोशांतीमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. संतोष घोडगे, सांस्कृतिक न्यासाचे श्री जयंत मिरिंगकर, भारत स्वाभिमानाचे श्री. कमलेश बांदेकर, ब्राह्मण महासंघ गोवाचे श्री. राज शर्मा, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, कुंडई तपोभूमी येथील पद्मनाभ संप्रदायाचे श्री. सुजन नाईक, जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी श्री. अनिल नाईक, तसेच उद्योजक श्री. राघव शेट्टी आणि कदंबाचे माजी महाव्यवस्थापक श्री. संजय घाटे हे उपस्थित होते.



या पत्रकार परिषदेत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे बोधचिन्ह (लोगो) आणि ‘धर्मेण जयते राष्ट्रम् ।’ या घोषवाक्याचे (टॅगलाईन) अनावरण करण्यात आले. 

महोत्सवाविषयी माहिती देतांना श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की, सनातन संस्था गेली २५ वर्षे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गोमंतकाच्या पवित्र भूमीतून, आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रामराज्य-स्वरूप आदर्श राष्ट्र निर्माण करण्यासाठी सामूहिक संकल्प केला जाणार आहे. याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल. भारतासमोर उभी असलेली आव्हाने पाहिली, तर सनातन धर्मियांचे अस्तित्व आणि सनातन धर्माचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे; म्हणूनच राष्ट्र्राचे सनातनत्व टिकवून ठेवणे आणि सनातन मानबिंदू अर्थात् गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणे यांसाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित केला आहे. गोव्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर तीन दिवसांसाठी संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि प्रतिष्ठित यांच्यासह २० हजारांहून अधिक साधक अन् धर्मनिष्ठ एकत्र येत आहेत. हा जणू गोमंतक भूमीतील सनातन धर्मीयांचा भव्य कुंभमेळाच असून येथे धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित होणार आहे.

या महोत्सवात देशभरातून येणारे संत, महंत तथा धर्मगुरु यांच्या संतसभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र, धर्म, संस्कृती आणि हिंदु समाज यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ते आपल्या ओजस्वी वाणीने मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शनही होणार आहे.

 महोत्सवाला आमंत्रित संत-महंत आणि विशेष मान्यवर : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, पतंजली योगपीठाचे संस्थापक प.पू. योगऋषि स्वामी रामदेवजी, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी आणि न्यासाचे महासचिव श्री. चंपत रायजी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष पू. महंत रविंद्र पुरीजी महाराज, अयोध्या हनुमानगढी येथील पू. महंत राजू दास, श्रीक्षेत्र तपोभूमी (कुंडई, गोवा) पिठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.