
खारघरचे मद्यविक्री परवाने तातडीने रद्द करा – आमदार विक्रांत पाटील यांची विधिमंडळात मागणी
पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर शहर हे दारुमुक्त शहर म्हणून ओळखले जाते, शहराच्या निर्मिती पासून आजपर्यंत दारू मुक्त शहर म्हणून ही ओळख कायम राखण्यात नागरिकांना आणि प्रशासनाला यश आले होते. परंतु आता काही धन दांडग्यानी या गोष्टीला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या ज्वलंत विषयात आवाज उठवत सध्या सुरु असलेल्या मुंबई येथील अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमदार विक्रांत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
हा परिसर स्वच्छ, सुंदर आणि सर्व मूलभूत सोयींनी सुसज्ज असून, शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो. येथे भारती विद्यापीठ, सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज, ए. सी. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज व यांसारख्या अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे व त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणाई शिकत आहे.या सर्व युवा शक्तीच्या भवितव्यासाठी आणि खारघर वासियांच्या भावना लक्षात घेता या भागात मद्य विक्री परवाने दिले जाऊ नये व दिलेले परवाने तातडीने रद्द करावे ही मागणी आ. विक्रांत पाटील यांनी केली.
यापूर्वीही काही समाजकंटकांनी खारघर परिसरात अवैध दारू विक्री करण्याचा प्रयत्न केला होता मात्र, स्थानिक नागरिकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून या प्रयत्नांना तीव्र विरोध करून हा कट उधळून लावला होता.
खारघर शहर दारूमुक्त असावे असा ठराव पनवेल महानगरपालिकेच्या महासभा सभागृहात सुद्धा करण्यात आला
आमदार विक्रांत पाटील यांच्या या दारू विक्री विरोधी भूमिकेचे खारघरवासीयांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे. अनेक सामाजिक संस्था, विद्यार्थी, पालक आणि रहिवाशांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

Be First to Comment