
डोंबिवलीमधून लवकरच रो-रो सेवा सुरू होणार ; जेट्टीच्या कामाचे भूमिपूजन
मुलुंड प्रतिनिधी : सतिश वि.पाटील
डोंबिवलीमधून लवकरच रो-रो सेवा सुरू होणार आहे. डोंबिवलीतून ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार प्रवास करणं सोप्पं होणार आहे. या रो-रो मधून आपल्या वाहनांसोबत प्रवास करता येणार आहे.
डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. डोंबीवलीतून आता थेट ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार याठिकाणी जलमार्गाने प्रवास करता येणार आहे. डोंबिवलीवरून याठिकाणी प्रवास करण्यासाठी लवकरच रो-रो सेवा सुरू होणार आहे. डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव खाडी परिसरातील गणेश घाटावर आज जेट्टीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
२२ कोटींचा निधी –
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, जेट्टीच्या कामासाठी २२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. लवकरच या मार्गाने जलवाहतूक सुरू होईल. रोरो बोटने वाहनांसह ठाणे, नवी मुंबई आणि वसई- विरार गाठणे शक्य होणार आहे . यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले .

जेट्टी बांधण्याचे काम सुरू –
२०१८ साली तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह या जलवाहतूक मार्गाची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन जलवाहतूक मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी बैठक घेतली होती. नितीन गडकरी यांनी या जलवाहतूक मार्गासाठी १ हजार कोटीचा निधीही मंजूर केला. कोवीड काळामुळे जलवाहतूक मार्गाचे काम होऊ शकले नाही. पण आता डोंबिवली मोठा गाव गणेश घाटावर जेट्टी बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या १०० दिवसांच्या कारर्किदीत या जलवाहतूक मार्गाचा समावेश केला आहे. त्यामुळे या मार्गासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे सांगत दीपेश म्हात्रे यांनी त्यांचे आभार मानले . डोंबिवलीत जेटीसाठी २२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
डोंबिवलीवरून कुठपर्यंत जाता येणार ?
जेट्टीच्या कामाला सुरुवात होऊन लवकर हा जलवाहतूकीचा मार्ग सुरु होईल. या जलवाहतूक मार्गाने नवी मुंबईला जाऊन आंतरराष्ट्रीय विमान तळ गाठता येईल. त्याचबरोबर ठाणे, वसई- विरार देखील गाठता येणार आहे. जेटी बांधल्याने रो-रो बोट सुरु केली जाईल. या रो-रो बोटने वाहने घेऊ जाता येतील. या जलवाहतूक मार्गामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे.
कधीपर्यंत सुरू होणार सेवा ?
डोंबिवली मोठागाव गणेश घाट येथे तिकीट घर आणि पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या जेट्टीमुळे परिसरातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जेटी बांधण्याचे काम येत्या १८ महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. १८ महिन्यानंतर रोरो बोट सेवा कार्यान्वित होणार असल्याचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.

Be First to Comment