

पेण, ता. १८ (वार्ताहर) : जगातील तमाम बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असणारे बुद्धगयातील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावा याकरिता मागच्या काही दिवसांपासून बुद्धगया येथे भिक्खू संघ आंदोलनास बसले असल्याने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज पेण तालुक्यातील सर्व बौद्ध समाज बांधवांनी मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी बोलताना ॲड.प्रमोद कांबळे म्हणाले की महाबोधी महाविहार हा सनातनी लोकांनी आपल्या ताब्यात ठेवले आहे त्याकरिता गेल्या अनेक वर्षापासून आपला समाज लढा देत आहे. तेव्हा अशा सनातनी लोकांनी समजले पाहिजे की तुम्ही या भारतातील भूमी कितीही खोदण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला बुद्धांचेच अवशेष सापडतील त्यामुळे आमचा लढा हा शांततेच्या मार्गाने आहे त्याला आक्रमक होण्यास लावू नका आमची अस्मिता महाबोधी विहाराशी आहे त्यामुळे तो तात्काळ बौद्धांच्या ताब्यात द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली.तर येणारा काळ पाहता आपण संघटन मजबूत करून केले पाहिजे आपले धार्मिकस्थळ ज्यांच्या ताब्यात आहे ते आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी भिक्खू संघांनी जी भूमिका घेतली आहे यासाठी वेळ प्रसंगी त्याठिकाणी जाणे आवश्यक असल्याचे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदर मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला.या मोर्चाला माजी नगरसेवक पांडुरंग जाधव, जनार्दन जाधव, गंगाराम गायकवाड, राजेश कांबळे, संदेश गायकवाड, संतोष गायकवाड, भगवान कांबळे, नारायण जोशी, संदीप सुर्वे, आनंद जाधव, सुशांत सुर्वे, प्रभाकर घायतले, किशोर वाघमारे, ॲड.वैशाली कांबळे, प्रतिभा जाधव, सुवर्णा सोनावणे, ॲड.सोनीया कांबळे आदींसह हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव, महिला वर्ग उपस्थित होते.
यावेळी नायब तहसीलदार नितीन परदेशी यांनी सदरचे निवेदन स्वीकारून ते तात्काळ वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Be First to Comment