
“कुणी पाणी देता का पाणी” पाणी मिळविण्यासाठी परदेशी कुटुंबियांची आर्त हाक !
तृप्ती भोईर : उरण
पाणी हे जीवन आहे सर्व सजींवासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि हेच पाणी पिण्यासाठी मिळविण्यासाठी परदेशी कुटुंब गेल्या ३८ वर्षापासून हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी आहेत,आणि ते तेथील मतदार आहेत, ग्रामपंचायतीमध्ये पिढ्यांपिढ्या ते तेथील रहिवासी आहेत.वेळच्या वेळी कर भरत आहेत. अस असुनही ग्राम आरोग्य पाणीपुरवठा समितीने त्यांचा पाणीपुरवठा गेले तीन महिने १ जानेवारी पासून बेकायदेशीर बंद केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रशासन कारवाई करत नसल्याने परदेशी कुटुंबावर फार मोठे पाण्याचे संकट ओढावले आहे.
अनेक मार्गाने शासकीय, निमशासकीय, कोर्टाची मदत घेऊन ते या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गेली कित्येक वर्षे झटत आहेत पण प्रत्येक वेळी त्यांच्या या समस्येला केराची टोपली दाखविली जात आहे. पाण्यासाठी त्यांचा लढा हा ते सर्व कुटुंबिय एकत्र येऊन कायदेशीर रित्या लढत आहेत. पण प्रत्येक वेळी त्यांची निराशा होत आहे. पाईपलाईन फक्त दिसते ,पण पाणी येत नसल्याने आज त्यांच्या डोळ्यातील पाणी मात्र थांबत नाही.त्यामुळे ते स्वतः टॅंकरने पाणी मागवत आहेत.

प्रशासनाच्या आदेशानुसार ते जरी शांतपणे आपला पाणी लढा लढत असले तरी पाणी पुरवठा करण्यासाठी अजूनही कोणतेही पाऊल प्रशासनाने उचललेले नाही.
आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की पृथ्वीवरील पाणी घेऊन तो इतर ग्रहावर संशोधनासाठी जात आहे. मोठमोठे शोध लावत आहे. पण पृथ्वीवर रहाणाऱ्या परदेशी कुटुंबियांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे हि आपल्या देशासाठी, राज्यासाठी उरण तालुक्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. उच्च अधिकारी, पोलीस कारवाई जर परदेशी कुटुंबियांना न्याय मिळवून देत नाहीत म्हणून परदेशी कुटुंबियांना आपला न्याय मिळविण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे.
पाणी पुरवठा अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ आणि आपली न्याय बाजू मांडण्यासाठी ८९ वर्षीय अनंत रामजीवन परदेशी यांनी सोमवार दिनांक १७ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्यासाठीचा मार्ग अवलंबिला.
सदरचे उपोषण सुरू केले असता मा. तहसीलदार,उरण मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती उरण मा. वरिष्ठपोलीस निरिक्षक पोलीस ठाणे उरण नवी मुंबई ,यांच्या कडून लेखी देण्यात आले आहे की, ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा अंतर्गत असलेला पाणी पुरवठा पोलीस बंदोबस्त घेऊन परदेशी कुटुंबियांना दिनांक २० मार्च २०२५ पर्यंत चालू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

Be First to Comment