
एक्सल कंपनीत प्रवीण घोसाळकर यांची आत्महत्या, ग्रामस्थांचा उद्रेक
रोहा : समीर बामुगडे
धाटाव एमआयडीसीतील एक्सल कंपनीमध्ये प्रवीण घोसाळकर या तरुण कर्मचाऱ्याने पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी आहे. कंपनीतील असह्य कामाचा ताण, व्यवस्थापनाची बेजबाबदार वर्तणूक आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी होत असलेले दुर्लक्ष यामुळेच ही आत्महत्या झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
धाटाव एमआयडीसीत याआधीही डीएमसी कंपनीत संधीला रामसिंग या कामगाराचा गॅस लागून मृत्यू झाला होता. मार्च महिन्यातच दोन मोठ्या दुर्घटना घडल्या असताना प्रशासन आणि कंपनी मालक फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. कामगारांचे आयुष्य धोक्यात असताना कंपन्यांमध्ये सुरक्षेचे नियम केवळ कागदावरच राहिले आहेत.
प्रवीण घोसाळकरच्या दुर्दैवी मृत्यूनंतर घोसाळे गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून एक्सल कंपनीवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. “आमच्या गावातील तरुणांना हे कंपनी मालक तुटपुंज्या पगारात राबवून घेतात आणि मग त्यांच्या मृत्यूची जबाबदारीही घेत नाहीत!” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे

धाटाव एमआयडीसीत नियमितपणे होणाऱ्या या दुर्घटनांमुळे कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कंपन्यांकडून फक्त नफा कमावण्याचा धंदा चालवला जात आहे, पण कामगारांच्या सुरक्षेचा विचार केला जात नाही. राज्य सरकार आणि कामगार विभाग याकडे डोळेझाक करत आहेत. या साऱ्या घटनांना जबाबदार असलेल्या कंपन्यांच्या व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा हा लढा अधिक तीव्र होईल.
या दुर्घटनांवरून कामगार संघटनांनीही कडाडून टीका केली असून, जर कंपन्यांनी सुरक्षा नियमांचे पालन केले नाही, तर मोठ्या प्रमाणावर संप आणि आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. “कंपनी मालकांच्या गलथान कारभारामुळे आमचे सहकारी मरत असतील, तर आम्ही शांत बसणार नाही!” असा थेट इशारा देण्यात आला आहे.
प्रशासन आणि कंपन्यांनी जर आता तरी डोळे उघडले नाहीत, तर धाटाव एमआयडीसीत आणखी किती कामगारांचे मृत्यू व्हायचे आहेत, हा मोठा प्रश्न आहे!

Be First to Comment