


पेण खारेपाट विभागातील ग्रामस्थ थेट हेटवणे धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याच्या पाण्यात उतरून आंदोलन
पेण, ता. ११ (वार्ताहर) : गेली अनेक वर्षे उलटून गेली मात्र तरीही पेण तालुक्यातील खारेपाट भागातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अनेक आंदोलने, उपोषणे झाली पण तरी आजतागायत या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आज थेट तालुक्यातील हेटवणे धरणावर जाऊन कालव्यामधील पाण्यात उतरून जल आंदोलन केले.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी सांगितले की या धरणाच्या पाण्यावर सर्वप्रथम आमचा हक्क असून तो हक्क मिळविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.नवी मुंबईला हेटवणे धरणाचे जाणारे पाणी रद्द करावे, जल बोगद्याचा मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा, आणि यासाठी लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावेत आदी मागण्या घेऊन या ग्रामस्थांनी हेटवणे धरणावर जल आंदोलन केले.

लायावेळी खारेपाट विभागातील आंदोलनकर्त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे, संतोष ठाकूर, हेमंत पाटील, सी.आर.म्हात्रे, राजन झेमसे, महेंद्र ठाकूर, जितेंद्र ठाकूर, राजेंद्र म्हात्रे, बळीराम भोईर, अभिमन्यू पाटील आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.पेणच्या खारेपाट भागासाठी ७६७ कोटी रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत, मात्र आज चार महिने झाले तरी कार्यारंभ आदेश यासाठी येत नाही ही शोकांतिका आहे. येथील लोकप्रतिनिधी जाणूनबुजून या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत आहेत. एकतर मार्च अखेर नंतर जरी हा कार्यारंभ आदेश आला तरी पावसाळा सुरू होईल त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.त्यामुळे खारेपाट भागाला पिण्याचे पाणी तात्काळ मिळावे हीच मागणी आमची सातत्याने राहिली आहे.
सदर प्रकल्पाची प्रक्रिया पूर्ण झाली असून शासन स्तरावर प्रस्ताव देखील पाठवला आहे.कामाची मंजुरी मिळाल्यानंतर कालव्याचे काम त्वरित सुरू होईल.
आर.एस.कापले, सहाय्यक अभियंता श्रेणी १
शेती सिंचन प्रकल्पाबाबत जो सेवा हमी कायदा आहे त्यात ज्या अधिकाऱ्यांनी दप्तर दिरंगाई केली आहे.त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत आम्हाला पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी मिळत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे.
प्रकाश माळी- अध्यक्ष, खारेपाट विभाग संकल्प विकास संघटना

Be First to Comment