
जिल्ह्यातील समुद्रकिनारी गस्त वाढवणे गरजेचे : महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे
रायगड : याकूब सय्यद
रायगड जिल्ह्याला विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे. या ठिकाणी तब्बल 31 समुद्र किनारे आहेत. पैकी 28 समुद्र किनारी नागरिकांसह पर्यटकांचा वावर असतो, तर अन्य तीन समुद्रकिनारी वर्दळ कमी असते. यासाठी वर्दळीच्या ठिकाणांसह निर्जन ठिकाणी गस्ती वाढवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी सांगितले.
रायगड पोलीस दलातर्फे अलिबाग समुद्र किनारी पोलीस मित्र शिल्प, अेटीव्ही गस्तीकारचे लोकार्पण मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना कु तटकरे म्हणाल्या 1993 साली मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्र किनारी उतरवण्यात आले होते. त्यानंतर एका बोटीमध्ये एके-47 यासह काही दारुगोळा देखील पोलीसांनी हस्तगत केला होता. त्याचप्रमाणे समुद्रामध्ये सुरु असणाऱ्या डिझेल तस्करीला आळा घालण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील समुद्रकिनारी गस्त वाढवणे गरजेचे असल्याचेही मंत्री कु तटकरे यांनी सांगितले.
अलिबाग समद्र किनारी एक एटीव्ही गस्ती कार देण्यात आली आहॆ. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून अन्य समुद्र किनारी अेटीव्ही गस्तीकार देण्याचे नियोजन करावे, अश्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना यावेळी दिल्या.

Be First to Comment