Press "Enter" to skip to content

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा देणाऱ्या कर्तृत्ववान डॉक्टर महिलांचा केला सत्कार

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने शुक्रवार दिनांक ७ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पूर्वदिनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा देणाऱ्या कर्तुत्वावर महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.तसेच प्राणिक हिलिंग प्रणालीच्या माध्यमातून रुग्णसेवा देणाऱ्या कर्तुत्ववान महिलांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून समर्पण भावनेतून समाजसेवा करणाऱ्या कर्तुत्ववान महिला डॉक्टरांना यावेळी शाल,श्रीफळ, सन्मानपत्र पुष्पगुच्छ आणि श्रीमद् भगवद्गीतेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणारी पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणून पनवेल तालुका पत्रकार विकास मंच प्रचलित आहे. तब्बल दोन दशकांहून जास्त कालावधीत पनवेल तालुका पत्रकार विकास मंच यांच्या वतीने दुर्गम क्षेत्रातील विविध जिल्हा परिषद शाळांच्यातून शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे, अभ्यास दौरे, सन्मान संध्या असे समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो. यंदाचे वर्षी जागतिक महिला दिनाचे निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतुल्य योगदान देणाऱ्या डॉ.जयश्री पाटील,डॉ. समिधा गांधी, डॉ. विशाखा म्हात्रे, डॉ. कांचन पाटील वडगावकर, डॉ मानदा पंडित यांना सन्मानित करण्यात आले.तर प्राणिक हिलिंग या प्रणालीच्या माध्यमातून रुग्णसेवा देणाऱ्या सौ. अर्चना विवेक पाटील आणि सौ मेघना संजय कदम यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर जयश्री पाटील म्हणाल्या की आज स्त्रीने स्वतःची प्रकृती सुदृढ ठेवणे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्व तिने आपल्या सुरक्षेला देखील दिले पाहिजे. भारतीय न्याय संहितेच्या ४९८ कलमाच्या अनुषंगाने प्रत्येक स्त्रीने आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या कायद्याचे अध्ययन केले पाहिजे. त्या म्हणाल्या की पनवेल तालुका पत्रकार विकास मंच नेहमीच आगळे वेगळे उपक्रम राबवत असतो. हृद्य सत्कार केल्याबद्दल त्यांनी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे मनःपूर्वक आभार मानले. तर सौ मेघना संजय कदम यांनी प्राणिक हिलींग बाबत उपस्थितांना अवगत केले. तसेच स्पर्श आणि औषध विरहित ही उपचार पद्धती काळाची गरज असल्याचे सांगितले.
  
 यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अध्यक्ष मंदार दोंदे, सल्लागार विवेक पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, दत्तात्रय कुलकर्णी,राजू गाडे,सुनील राठोड,वैभव लबडे आदी सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

पनवेल तालुका पत्रकार मंच हेतू पुरस्सर पणे जागतिक महिला दिनाच्या पूर्वदिनी कार्यक्रम साजरा करत असतो.ज्यायोगे सत्कार मूर्तींना जागतिक महिला दिन त्यांच्या मनाप्रमाणे व्यातीत करता यावा. पुस्तक भेट स्वरूपात देण्याचा कटाक्ष आम्ही आवर्जून पाळतो.सत्कार मूर्तींच्या कार्यक्षेत्री अथवा त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानित करणे ही देखील मंचाची खासियत आहे.

…मंदार दोंदे, अध्यक्ष, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.