
पेण, ता. ७ (वार्ताहर) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्या जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विवादास्पद वक्तव्याबाबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पेण तालुक्यातील शिवसैनिकांनी नगरपालिका चौकात निषेध व्यक्त करून निदर्शने केली.
यावेळी विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, सह समन्वयक समीर म्हात्रे, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, शहर प्रमुख सुहास पाटील, विनोद म्हात्रे, हिराजी चोगले, तुकाराम म्हात्रे, महेश पोरे, योगेश पाटील, मेघना चव्हाण, वैशाली समेळ, राजश्री घरत आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबईमध्ये येणाऱ्यांनी मराठी शिकले पाहिजे असे काही नाही, इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात एवढेच काय तर मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे असे वक्तव्य करून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या भैय्या जोशी यांच्या या वक्तव्याचा आज पेण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना प्रसाद भोईर म्हणाले की जे काही वक्तव्य होत आहेत ती सत्ताधारी जाणूनबुजून घडवून आणत आहेत हा खाऱ्या अर्थाने मराठी भाषिकांचा अपमान आहे.सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न राज्यातील मराठी भाषिक आणि बाळासाहेबांचे हे शिवसैनिक कधीच खपवून घेणार नाहीत.राज्य शासनाच्या एकाधिकार शाहीचा आणि भैय्या जोशीच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत शिवाय या भैय्या जोशीसह प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर आणि अबू आझमी यांनी जे वक्तव्य केले आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अबू आझमी यांची तात्पुरती नाही तर कायमस्वरूपी आमदारकी रद्द करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Be First to Comment