

खोपोली नगरपालिकेच्या प्रास्ताविक प्रारूप विकास योजनेच्या क्रमांक 51 एस डब्ल्यू एम एफ झोन संदर्भात हरकत घेण्यासाठी लव्हेज, चिंचवली शेकिन, श्रीराम नगर, उदय विहार, सरस्वती नगर आणि डीपी रोडवरील रहिवाशांनी तीव्र विरोध सुरू केला असून प्राथमिक स्वरूपात खोपोली नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. नगरपालिका प्रशासना विरोधात संतापलेल्या नागरिकांनी धरणे धरून जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांच्या कडे लेखी निवेदन देत नियोजित डम्पिंग ग्राउंडला सर्वांनी विरोध दर्शवला आहे.

खोपोली नगरपालिकेच्या नियोजित डम्पिंग ग्राउंडमुळे आजूबाजूला असलेल्या लोक वस्ती, शाळा आणि कारखान्याला मोठी बाधा निर्माण होणार असून आरोग्याच्या समस्या निर्माण होणार असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
खोपोली नगरपालिकेच्या नियोजित डम्पिंग ग्राउंडला नागरिकांचा विरोध हा प्राथमिक स्वरूपाचा असून भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा मनोदय यावेळी मोर्चेकर्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिक, महिलांनी निषेध मोर्चात महत्वाची भूमिका बजावली होती.

Be First to Comment