

वणव्यात होरपळलेल्या झाडांना पर्यावरण प्रेमिंनी दिली नवसंजीवनी
खोपोली : प्रतिनीधी
खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून शेडवली उपनगरात असलेल्या माळरानावर जुलै 2024 मध्ये मियावाकी गार्डनची निर्मिती करून एक नवा पर्यावरणपूरक उपक्रम राबवून हजारो झाडांची लागवड केली होती. या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी नगरपालिकेने विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील या ठिकाणी केली होती त्याच सोबत ठिबक सिंचन पद्धतीने झाडांना माफक पाणी देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली होती. दुर्दैवाने शेडवली परिसरात लागलेल्या वनव्यांमुळे व्यवस्थित वाढ झालेली बहुतांशी झाडे होरपळली आणि त्याचसोबत ठिबक सिंचन यंत्रणादेखील जळून खाक झाल्याची बाब सकाळच्या वेळी शेडवली परिसरात मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी नित्यनेमाने येणाऱ्या शीळफाटा येथील मॉर्निंग स्टार ग्रुपच्या सदस्यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच होरपळलेल्या मियावाकी गार्डनला पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दररोज सकाळी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन अंग मेहनत करत प्रत्येक झाडाला बादलीने पाणी घालण्याचा नित्यक्रम सुरू केला. हळूहळू त्यांच्या प्रयत्नाला यश येताना दिसत असून होरपळलेल्या झाडांना नवी पालवी फुटू लागली आहे.

खोपोली नगरपालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ खऱ्या अर्थाने पर्यावरणाला होणार असल्याने वनव्याने खाक झालेल्या मियावाकी गार्डनला पुनर्जीवित करण्याची जबाबदारी स्वीकारून मॉर्निंग स्टार ग्रुपने केलेल्या प्रयत्नांचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी कौतुक केले आहे. सकारात्मक मानसिकतेने जेंव्हा नागरिक सार्वजनिक उपक्रमात सहभागी होतात तेंव्हा त्याचे योग्य परिमाण दिसून येतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे मरणासन्न अवस्थेतील झाडांना फुटलेली नवी पालवी आहे असे त्यांनी सांगितले.

Be First to Comment