Press "Enter" to skip to content

नवीन गाड्यांवर सुधारित सूचना लावण्याचे बेस्ट प्रशासनाचे सुराज्य अभियानाला आश्वासन!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असतांना बेस्ट बसमधील अशुद्ध मराठी सूचनांमुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये संताप!

मुंबई – एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील बेस्ट बसगाड्यांमधील सूचना फलकांमध्ये ‘पोलिसानां’, ‘न्यावि’, ‘प्रवाश्यांनी’ आदी भयंकर अशुद्ध मराठी शब्द पाहून मराठीभाषा प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे वातानुकूलित, इलेक्ट्रिक अशाप्रकारे बेस्ट बसचा दर्जा सुधारत असतांना मराठी भाषेचा दर्जा का घसरत आहे ? महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी भाषेची होणारी दुरावस्था तात्काळ दूर करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने प्रवाशांसाठी बसगाड्यांमध्ये लावलेल्या मराठीतील सूचनांचा दर्जा सुधारावा आणि त्या शुद्ध प्रमाणित मराठीत असाव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने बेस्ट प्रशासन, मराठी भाषामंत्री आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावर ‘बेस्ट’चे सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीनिवास राव यांनी सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की, तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत. याविषयी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊ. सध्या बेस्टकडे ५०० नवीन गाड्या आहेत, तसेच नव्याने २ हजार ५०० नवीन गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. या सर्व गाड्यांवर सुधारित सूचना लावण्यात येतील. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता राहुल पाटकर, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड, अधिवक्ता सुरभी सावंत, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. सुभाष अहिर, श्री. निखिल दाते, सुराज्य अभियानाचे श्री. प्रसाद मानकर आणि बेस्टचे जनसंपर्क प्रमुख श्री. सुदास सावंत हेही उपस्थित होते.

सुराज्य अभियानाच्या कार्यकर्त्यांनी बेस्टच्या बसगाड्यांमधील काही सूचना अशुद्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने सूचना आणि परिपत्रके जारी करताना त्यांची शुद्धता तपासण्यासाठी 'मुद्रितशोधक' पद निर्माण करावे, भविष्यात सूचना आणि परिपत्रकांचे अंतिम प्रमाणन मुद्रितशोधकांकडून करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच बेस्ट प्रशासनातील कर्मचाऱ्यांना शुद्ध मराठी लेखनाचे प्रशिक्षण देण्याचा मुद्दाही चर्चेत आला. मराठी भाषेच्या शुद्धतेसाठी हे महत्त्वपूर्ण निर्णय लवकरात लवकर अंमलात यावेत, अशी मागणी या वेळी सुराज्य अभियानाच्या वतीने करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.