
ऐतिहासिक असणाऱ्या गढीवर हिरवी चादर चढवून विटंबना ; गुन्हा दाखल करण्याची सह्याद्री प्रतिष्ठान कडून मागणी
पेण, ता. ४ (वार्ताहर) : पेण शहराच्या तहसील तसेच पोलिस ठाणे कार्यालय येथील आवारात असणाऱ्या इतिहासकालीन ऐतिहासिक गढीवर काही लोकांनी हिरवी चादर चढवून विटंबना केली असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने पेण पोलीस ठाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील एक ऐतिहासिक गढी सदर परिसराच्या जागेत असून ही गढी ऐतिहासिक नोंदीनुसार तत्कालीन शूर सरदार वाघोजी तुपे यांची समाधी असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या जागेत काही अवशेष आढळून येतात त्यानुसार या गढीवर नवव्या ते बाराव्या शतकातील शिलाहार राजाच्या काळात बांधलेले मंदिराचे अवशेष असावेत असाही अनेक इतिहास अभ्यासकांचा मत आहे.
त्यामुळे या भागात कोणतीही दर्गा किंवा कबर असल्याचा इतिहासात कुठेही उल्लेख आढळून येत नाही मात्र तरीही काहींनी जाणूनबुजून मागच्या दोन चार दिवसांपूर्वी येथे एकत्र येत सदर गढीवर हिरवी चादर चढवून तीची विटंबना केल्याचे दिसत असल्याने यामुळे समाजातील भावना दुखावल्या असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा काहिंचा हेतू असल्याने अशा विकृतांवर गुन्हे दाखल करावेत अशा मागणीचे निवेदन पेण सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने पेण पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. यावेळी स्वरूप घोसाळकर, मयूर वनगे, शिवसेना जिल्हा संघटक नरेश गावंड, प्रतिष्ठानचे रोशन टेमघरे, रोशन पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment