Press "Enter" to skip to content

वाचा ‘महाशिवरात्री’ निमित्त विशेष लेख


महाशिवरात्रीचे महत्त्व आणि शिवाच्या उपासनेमागील शास्त्र ; महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे !

 महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. महाशिवरात्र हे व्रत 'माघ कृष्ण चतुर्दशी' या तिथीला करतात. देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची 3 अंगे आहेत. शिवाच्या उपासनेच्या अंतर्गत विविध कृती आहेत. शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ? आणि शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र यांविषयीचे शास्त्रीय विवेचन यांसह महाशिवरात्रीचे महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात केले आहे.

महाशिवरात्री व्रताचे महत्त्व काय आहे ? : भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. तो काळ पृथ्वीवर वर्षातून एकदा महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो, कारण पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. पृथ्वी आणि उच्चलोकांतील कालमानात अंतर आहे. पृथ्वी जड (स्थूल) आहे. जडाची गती खूप कमी असते. म्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो. देवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती जास्त असते. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतो. यामुळेच पृथ्वी अन् देवता यांच्या कालमानात अंतर आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सर्व जिवांना आवर्जून मार्गदर्शन करतात. त्यामुळे अनेक जीव शिवाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्या दिवशी शिवलोकात उपस्थित असतात.

महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे ? : महाशिवरात्री व्रताचे दोन प्रकार आहेत – काम्य आणि नैमित्तिक. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचार पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी.

महाशिवरात्रीच्या रात्री करावयाची यामपूजा ! : शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी. बारा, चौदा किंवा चोवीस वर्षे हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे.

महाशिवरात्रीच्या दिवशी हे अवश्य करा !

  1. दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा.
  2. शिवपिंडीला अभिषेक करा.
  3. पांढ-या अक्षता, पांढरी फुले, बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा.
  4. भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

महाशिवरात्रीला शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ या षडक्षर मंत्राचा नामजप करा !
महाशिवरात्र या दिवशी शिव-तत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय ’ हा नामजप जास्तीतजास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते. आपल्याला शिव-तत्त्व अधिकाधिक ग्रहण करता येते.

शिवाच्या उपासनेमागील शास्त्र

शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ?

शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालतांना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी (शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत) असते. प्रदक्षिणेचा मार्ग तेथून चालू होतो. प्रदक्षिणा घालतांना पन्हाळीपासून स्वतःच्या डाव्या बाजूने पन्हाळीच्या दुसर्‍या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरावे आणि पुन्हा पन्हाळीच्या पहिल्या कडेपर्यंत येऊन प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.

शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र

बेलाची वैशिष्ट्ये
त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम् ।
त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् ।। – बिल्वाष्टक, श्लोक १

अर्थ : तीन पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, तीन डोळ्यांप्रमाणे असणारे, तीन आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो.

बेल उपडा वहाण्यामागील कारण – बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही.
बेलाचे आरोग्यदृष्ट्या असलेले लाभ – आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदलरससेवनाला महत्त्व दिले आहे. बेलफळाला आयुर्वेदात अमृतफळ म्हणतात. बेलाने बरा होत नाही, असा कोणताही रोग नाही. कोणतेही औषध न मिळाल्यास बेलाचा वापर करावा; मात्र गरोदर स्त्रीला बेल देऊ नये; कारण त्याने अर्भक मरण पावण्याची शक्यता असते.

या लेखात सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीमागील शास्त्र समजून आणि त्यानुसार कृती करून, शिवभक्तांनी अधिकाधिक शिवतत्त्वाचा लाभ करून घ्यावा, ही भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना !

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘शिव’
संपर्क क्र. : 9920015949

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.