

पेण खोपोली रस्त्याची वनविभागामुळे दुरावस्था सुनील जाधव यांचा आत्मदहनाचा इशारा
पेण, ता. २४ (वार्ताहर) : मागील पाच ते सहा वर्षांनंतर पेण तालुक्यातील झालेली आमसभा विविध प्रश्नांवर गाजली असून नागरीकांनी उपस्थित केलेले प्रश्नांवर अधिकारी वर्गाची भांबेरी उडाली तर यावेळी पेण खोपोली राज्यमार्गावरील वाकरुळ ते गागोदे खिंड आरावपर्यंत वनविभागाच्या न मिळालेल्या परवानगीमुळे येथील रस्त्याचे काम रखडले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत त्यामुळे सदरच्या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे अन्यथा वनविभाग कार्यालाजवळ आपण आत्मदहन करू असा इशारा सुनील जाधव यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.

पेण पंचायत समिती यांच्या माध्यमातून २०२४- २०२५ ची आमसभा पेण आगरी समाज हॉल येथे दि. २४ रोजी आयोजित करण्यात आली होती.या आमसभेला खासदार धैर्यशील पाटील, आमदार तथा आमसभा अध्यक्ष रवीशेठ पाटील, प्रांताधिकारी, प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, माजी जी.प.सदस्य डी.बी.पाटील, गटविकास अधिकारी सोनल सुर्यवंशी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, भाजप तालुकाध्यक्ष श्रिकांत पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रसाद म्हात्रे, राजाराम मोरे आदिंसह विविध खात्यातील अधिकारी तसेच तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमसभेच्या सुरुवातीलाच देशभरासह तालुक्यातील विविध स्तरावरील स्वर्गवासी झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा ठराव घेण्यात आला.तर नंतर आमसभेला झालेली सुरुवात पाहता येथील गेल कंपनीमुळे शेतकऱ्यांवर झालेला अन्याय, तालुक्याच्या आदिवासी समाजाच्या वाड्या वस्त्यांना गावठाणाचा दर्जा मिळावा तसेच निधवली येथील रखडलेला गावठाणाचा प्रस्ताव तपासून घेतला जाईल, एमएमआरडीए बाबत हरकती घेतल्या आहेत त्यांची जनसुनावणी झाली पाहिजे शासन सक्तीने जमीनी घेत असतील तर याबाबतचा विरोधातील ठराव आमसभेत घेतला पाहिजे यासह सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी आदिवासी समाज बांधवांना जमीनी मिळाल्या आहेत त्यांच्यावर अन्याय होत असून अनेकांनी या जमिनी कमी मोबदल्यात फार्म हाऊससाठी घेतल्या आहेत त्यांची चौकशी करावी तसेच रेशन कार्ड करण्यासाठी जवळपास १ हजार रुपये घेतले जातात त्यावरती बंधन आणून अनेक तलाठी कार्यालयात न बसता बाहेरून आपली कामे करतात त्यामुळे नागरिकांना नाहक याचा फटका बसत आहे.त्यावर प्रांताधिकारी यांनी तात्काळ उत्तर देत या सर्वांची चौकशी करण्यात येईल असे सभागृहात सांगितले.
तर तालुक्यातील या समस्यांसह गणपती कारखानदार, जलजीवन मिशन योजनेची ठप्प झालेली कामे, उर्णोली सोनखार येथील पाण्यासाठी नागरिकांची होणारी गैरसोय अनेक प्रश्नांना आमसभेत नागरिकांनी वाचा फोडली खरी मात्र सदर प्रश्न हे कागदावरच न राहता त्या प्रश्नांची सोडवणूक होणे आवश्यक असल्याचे अनेकांनी सांगितले असले तरी सदरची आमसभा ही तालुक्यातील विविध प्रश्नांवर गाजली.यावेळी संदीप पाटील, नंदा म्हात्रे, समीर म्हात्रे, मंगल पाटील, अमित पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांची भांबेरी उडवली.




Be First to Comment