
पेण खारेपाटाच्या वाशी सरेभागासह अनेक वाड्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई
पाणीटंचाईचा आराखडा मंजूर झाला नसल्याने टँकर सोडता येत नाही ; प्रशासनाने केले हात वर
पेण, ता. २३ (राजेश कांबळे) : पेण तालुक्याच्या खारेपाट भागातील वाशी सरेभागासह अनेक वाड्या वस्त्या वर्षानुवर्ष पाणीटंचाईला सामोरे जात असल्याने येथील नागरीकांच्या जीवनाची परवड होत आहे.त्यातच यावर्षीच्या तयार करण्यात आलेला पाणीटंचाई आराखडा अजूनही जिल्हा परिषद कडून मंजूर न झाल्याने खारेपाटात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत नाही त्यामुळे येथील नागरीकांची पाण्यासाठी भयानक अवस्था दिसत आहे.

एकीकडे तालुक्यातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठलवाडी, बोर्झे लाखोले, बहिराम कोटक, तामसीबंदर, तुकाराम वाडी, कान्होंबा या गावांसह येथील अनेक वाड्या वस्त्या गेले कित्येक वर्षापासून पाणी टंचाईला सामोरे जात असल्याने राज्य सरकारने या पाणीटंचाई भागासाठी जवळपास ४० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला मात्र आजतागायत या भागाला पाणीपुरवठा सुरळीत झालाच नाही त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पेण खारेपाट भागासाठी पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाकडून येथील १६० वाड्या आणि ३६ गावांना टॅंकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा तसेच विहिरी दुरुस्ती करणे यासह इतर कामांकरीता पाणीटंचाई आराखडा करीता १ कोटी ८९ लाख ५० हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.परंतू जिल्हा परिषद अलिबाग प्रशासनाकडून सदर पाणीपुरवठा विभागाचा अजूनही पाणीपुरवठा आराखडा मंजूर झाला नसल्याने या भर उन्हाळ्यात येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे येथील पाणीटंचाई केव्हा दूर होईल याचीच चिंता नागरिकांना लागून राहिली आहे.

या भागातील पाणीटंचाईची परिस्थिती येथील लोकप्रतिनिधींनी करून ठेवली आहे गेले कित्येक वर्ष झाली येथील पाणीटंचाई दूर होण्याचा नावच घेत नाही त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा सामना दरवर्षी करावा लागत आहे.एकीकडे जल जीवन मिशन योजनेची कामे अपूर्ण असल्याने तसेच रस्त्यापासून दूर असणारी गावे, वाड्या वस्त्या यांना अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने प्रशासना विरोधात नागरिकांची उदासीनता जाणवू लागली आहे.
राजन झेमसे – सामाजिक कार्यकर्ते खारेपाट विभाग
पेणच्या वाशी खारेपाट विभागासाठी यावर्षी जवळपास दोन कोटीच्या आसपास पंचायत समिती कडून पाणीटंचाई आराखडा पाठविण्यात आला आहे.मात्र जिल्हा परिषदेकडून अजूनही तो मंजूर न झाल्याने येथील गावे तसेच वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करता येत नाही. आराखडा मंजूर होताच तात्काळ पाणीपुरवठा करण्यात येईल.
सूर्यकांत परब – सहाय्यक अभियंता पुरवठा विभाग पंचायत समिती पेण




Be First to Comment