उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपण सगळेच अनुभवत आहोत. दरवर्षी ५ ते ६ उष्णतेच्या लाटा भारताच्या उत्तर भागात येतात. महाराष्ट्र राज्यात उत्तर आणि पूर्व विभागांमध्ये उष्णतेच्या लाटा सातत्याने येत असतात. कोकण किनारपट्टीला उष्णतेच्या लाटांचा फारसा अनुभव नाही. परंतु गेले पाच दिवस ४०° से तापमानामुळे कोकण किनारपट्टी भाजून निघत आहे. पनवेल शहर सातत्याने ४२ डिग्री तापमानाचा अनुभव घेते आहे. तमाम वृत्तवाहिन्यांवर पनवेल परिसरात ४३.१° से असे सर्वोच्च तापमान नोंदवले गेल्याची बातमी झळकली. जळगाव,अकोला आणि पुणे अशा हॉट शहरांना पनवेलने तापमानाच्या बाबतीत त्या दिवशी मागे टाकले होते. साधारणपणे ज्या गोष्टीची धास्ती वाटायला हवी, त्याचीच स्टेटस स्टोरिज रिल्स आमचे काही उत्साही बांधव ठेवत होते. सातत्याने वाढणारे तापमान हे निश्चितच चिंतेचे कारण आहे पण त्याहीपेक्षा जास्त चिंतेचे कारण हे आहे की नागरिकांना अजूनही या गोष्टीचे गांभीर्य कळत नाही.
हॅश टॅग पनवेलकरांचा नाद नाय करायचा ! किंवा हॅशटॅग वी आर हॉट ! झालेच तर हॅशटॅग भून के रख दुंगा !! असे अचकट विचकट थीम घेत समाज माध्यमांवर टीमडी वाजवण्याचे प्रकार सुरू होते. ज्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे तीच गोष्ट कॉलर वर करून सांगितली जात होती.पण मला सांगा ही परिस्थिती अचानक उद्भवली का ? निसर्गात कुठलीही गोष्ट अचानक उद्भवत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपणच जबाबदार असतो. विकासाच्या नावाखाली बहुवार्षिक वृक्षांची बेसुमार कत्तल, उघडे बोडके पडलेले आजूबाजूचे डोंगर, विमानतळ उभारण्याच्या नावाखाली सपाट करून टाकलेल्या टेकड्या, हवे तसे बदललेले नद्यांचे मार्ग, आकुंचन पावत चाललेले खाडी मुख, शोधावे लागणारे कांदळवन आणि भूगर्भजलाचा हावरटासारखा केलेला उपसा या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणजे यंदाच्या वर्षी अनुभवलेले सर्वोच्च तापमान. साडेचार दशकांचा माझा अनुभव आणि त्यापूर्वीचा कालखंड यात कधीही पनवेलचे तापमान उन्हाळ्यात ३७-३८ डिग्री सेल्सिअस पुढे गेल्याची नोंद नाही.उष्णतेच्या लाटेमुळे सर्वात जास्त हानी मनुष्य, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींची होते. परवा नोंदवलेले तापमान ही तर फक्त सुरुवात आहे किंबहुना हा तर ट्रेलर आहे मुख्य पिक्चर अजून रिलीज व्हायचा बाकी आहे. यासाठी लाखो वृक्षारोपण आणि टिकलेल्या झाडांचे संवर्धन करावेच लागेल अन्यथा “वुई आर हॉट” म्हणता म्हणता आपली राख कधी होऊन जाईल हे कळणार देखील नाही.
विकास हवा पण तो सुनियोजित हवा.आज येऊ घातलेल्या बहुउद्देशीय कॉरिडोर, अलिबाग विरार कोस्टल हायवे, वडोदरा मुंबई हायवे, मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण अशा प्रकल्पांच्या साठी जुन्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेली वड, पिंपळ,आंबा करंजा, कडुलिंब, जांभूळ,चिंच अशी हजारो बहुवार्षिक झाडे तोडली गेली आहेत. विमानतळ गाभा क्षेत्र आणि त्यातून निघालेला खडक डंप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन गावांच्या जमिनीवर कोणे एकेकाळी किमान ५००० मोठे डेरेदार वृक्ष होते. आज तिथे गवताचे पाते देखील नाही. १५० ते २०० छोटी मोठी झाडे असलेली उलवा टेकडी अक्षरशः सपाट करून टाकली आहे.बेसुमार भरावाने खाडी मुख आकुंचन पावले आहे. विमानतळासाठी नदीचा मार्ग चक्क ९० अंश कोनात वळवलेला आहे.अशाने तापमान वाढले नसते तरच नवल वाटले असते.
सर सकट सगळे रस्ते सिमेंट चे बनविणे यामुळे देखील तापमान वाढते. वास्तविक द्रुतगती महामार्ग आणि राज्य महा मार्ग या ठिकाणी जास्त वर्ष टिकतो म्हणून सिमेंटचे रस्ते बांधणे संयुक्तिक ठरते. जलद प्रवासासाठी देखील सिमेंटचे रस्ते अत्यावश्यक असतील परंतु शहरांतर्गत प्रत्येक रस्ते सिमेंटचे केल्यामुळे शहरातील तापमान वाढते. डांबरी रस्ते कमी तापतात तसेच हे रस्ते पावसाळ्यात पाणी शोषून घेतात त्यामुळे भूगर्भजल पातळी देखील वाढते परंतु सिमेंटचे रस्ते पर्यायाने जास्त तापतात,तसेच ते ऊर्जा परावर्तित करतात. हे रस्ते बनविताना खाली पॉलिथिन शीट टाकल्यामुळे सिमेंट रस्ते पाणी शोषत नाहीत यावरून पाणी वाहून गटारात जाते व भूगर्भजल पातळी वाढवण्याकरता हे रस्ते कुचकामी ठरतात. थोडक्यात अधिक काळ टिकतो …हा एकमेव मुद्दा सोडला तर सिमेंटचे रस्ते पर्यावरणास हानिकारक आहेत आणि आपण तर छोट्यातील छोटी गल्ली सुद्धा सिमेंट काँक्रेट ने अच्छादून टाकत आहोत.
वाढलेले तापमान आटोक्यात आणण्याचे नैसर्गिक उपाय म्हणजे जलस्त्रोत आणि झाडे.विमानतळाच्या उभारणीसाठी भराव करून छोटी तळी,डबकी बुजवली गेलीत.उलवे नोड,तळोजा नोड,खारघर एक्सटेन्शन नोड वसवताना किमान डझनभर तळवांच्यात मुरूम खडक पडून ते चिरनिद्रा घेत आहेत.मातीची कौले,मातीच्या पासून केलेल्या भाजलेल्या विटांच्या भिंती कालबाह्य झाल्यात.सिमेंट रेडीमिक्स विटा आणि काँक्रिट बांधकाम ऊर्जा परावर्तित करत असतात.त्यामुळे तापमान वाढ होतच राहणार.सध्या पनवेलचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह ज्या जागेवर उभे आहे तिथे तलाव होता. वडाळे तलावाचे कितीही सुशोभीकरण केले असले तरी त्याच्या मूळ क्षेत्रफळातील जवळपास ४० % तलाव बुजवून त्यावर मोठ मोठाले टॉवर उभे आहेत. कृष्णाळे,देवाळे तलावांचे परिघ कमी झालेत. विश्राळे तलावाच्या सुंदर चौसोपी पेशवेकालीन पायऱ्यांवर बिनदिक्कत “काही विशिष्ट रंगाच्या” घरांचे अतिक्रमण वाढत चाललंय… हे आटोक्यात नाही आणलं तर तापमान वाढणारच.
आहेत ते जलस्त्रोत टिकवून ठेवणे, प्रत्येकाने किमान एक झाड लावणे आणि ते जगवणे याशिवाय तापमान वाढ आटोक्यात येणार नाही. वुई आर हॉट ! हे अटीट्युड वाले वाक्य नाटक मालिका सिनेमा चित्रपटातच ठीक वाटते.जर तापमान आटोक्यात आणून उष्णतेच्या लाटी परत निर्माण होऊ नयेत अशी भावना असेल तर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन याशिवाय दुसरा पर्याय नाही.
वुई आर हॉट….!
More from UncategorizedMore posts in Uncategorized »
Be First to Comment