अजूनही सांगतो नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव द्या तुमचा झेंडा खांद्यावर घेऊन तुमचा प्रचार करीन
– भाई राजेंद्र पाटील यांचे केंद्र सरकारला खणखणीत आव्हान
पनवेल / प्रतिनिधी
पनवेल येथील चिंचपाडा मधील श्री काळभैरव मंदिराच्या प्रांगणामध्ये समस्त दिनकर बाळू पाटील प्रेमी प्रकल्पग्रस्त बांधवांनी किर्तन भजन जागर करत केंद्र सरकारला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील साहेबांचे नाव देता? की सत्तेतून जाता? असा खणखणीत सवाल विचारला आहे. दि बा पाटील साहेब यांचे विमानतळाला नाव देण्यासाठीच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या बोटचेप्या भूमिकेचा देखील यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी दि बा पाटील यांच्या ९८ व्या जयंती निमित्ताने भजन किर्तन जागर सोहळा आयोजित करण्यात आला होता.
श्री काळभैरवाचे दर्शन घेऊन छोटेखानी दिंडी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये प्रांगणातील सभास्थानी अवतरली. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती लाक्षणीय होती. ह भ प अरुण बुवा कारेकर यांनी त्यांच्या ओघवत्या शैली मध्ये प्रास्ताविक सादर केले. दी बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या सरकार ला एड विजय शिरढोणकर यांनी आपल्या मनोगतात चांगलेच झोडपून काढले.तरुण आणि उमद्या व्यक्तिमत्वाचे प्रेम पाटील यांनी जोषपूर्ण भाषणातून सरकारला इशारा दिला की जर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील साहेबांचे नाव दिले नाही तर आम्ही प्रकल्पग्रस्त बांधव होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालू.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या आक्रमक शैलीतून भाषण करत समस्त दी बा प्रेमींना सरकार विरोधात काम करण्याचे आवाहन केले.आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतूच्या उद्घाटनादरम्यान थोर लोकनेते दिनकर बाळू पाटील यांच्या नावाचा साधा उल्लेखही न केल्याबद्दल त्यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की राष्ट्र निर्मितीचे प्रकल्प ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीवर उभे राहतात त्यांच्या भावनांच्याप्रति केंद्र सरकार जरा सुद्धा संवेदनशील नाही. अटल सेतूला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यापूर्वी महाराष्ट्रातील एकही माजी नेता त्या लायकीचा नाही असे या केंद्र सरकारला का बरे वाटले असेल? देवेंद्र फडणवीस ज्या विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाचा उदो उदो करत असतात त्यांचे नाव का नाही दिले? ज्या सागरावर हा सेतू उभारला आहे त्या सागरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली नाव ज्या सेनापतींनी नेली त्या सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नाव का नाही दिले? हे फक्त शाहू,फुले,आंबेडकर यांचे नाव घेत बसणार पण त्यांच्या पैकी एकाचही नाव द्यावे असे का नाही वाटले?
राजेंद्र पाटील पुढे म्हणाले की विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी जी संघर्ष समिती स्थापन झाली आहे तिचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक आंदोलने केली पण आता मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठका घेत असल्याचं फक्त नाटक करत आहेत.ते म्हणाले मी अजूनही सांगतो नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव द्या ! मी जरी शेकाप चा असलो तरी तुमचा झेंडा खांद्यावर घेऊन तुमचा प्रचार करीन.
भजन कीर्तन जागर सोहळ्याच्या सुरुवातीला गणेश पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर दि बा पाटील साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तमाम उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. त्यानंतर दी बा पाटील साहेबांच्या जयघोषणाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या सोहळ्याला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, एड विजय शिरढोनकर, पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, मो का मढवी गुरुजी, ह भ प विष्णू बुवा ओवळेकर, ह भ प आरुण बुवा कारेकर,प्रल्हाद महाराज,प्रेमनाथ बुवा पाटील,अनंत महाराज परदेशी,आंबो धनगर भोईर,विठाबाई अंबो भोईर आदींच्या सह विद्यार्थी,महिला,शिक्षक,ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
चौकट

Be First to Comment