Press "Enter" to skip to content

प्रभुदास भोईर आणि खीडुक पाडा ग्रामस्थांच्या संघर्षाला आले यश

तब्बल 31 कोटी रुपयांच्या निधीतून होणार भक्कम अंतर्गत रस्त्यांची उभारणी

आशियातील सगळ्यात मोठ्या असणारा लोखंड बाजार अशी ज्याची ख्याती आहे तो मुंबई महानगर प्राधिकरण लोखंड व पोलाद बाजार, कळंबोली यांच्या वतीने 31 कोटी रुपयांच्या निधीमधून 17 रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन मंगळवार दिनांक 12 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. लोखंड व पोलाद बाजाराच्या कुशीमध्ये वसलेल्या खिडूकपाडा ग्रामस्थ व शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी या रस्त्यांच्या निर्मिती करता सातत्याने गेले अडीच वर्ष पाठपुरावा केलेला होता. त्यांनी केलेल्या संघर्षाला आज यशाची गोमटी फळे आलेली आहेत.
लोखंड व पोलाद बाजार समितीच्या वतीने येथील व्यावसायिकांना विविध सेवा सुविधा पुरविल्या जातात. याच बाजार समितीच्या हद्दीमध्ये खिडूकपाडा गाव येत असल्याने येथील भयावह परिस्थिती असलेल्या अंतर्गत रस्त्यांमुळे खिडूकपाडा ग्रामस्थ जीव मुठीमध्ये घेऊन जगत होते. एवढेच नव्हे तर रायगड जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यात तर अक्षरशः मुलं बुडतील इतके मोठे खड्डे झाले होते. रस्त्यांवर सर्वत्र दलदलीचे साम्राज्य असायचे. प्रभुदास भोईर, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर, भीमशक्ती संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड व त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांनी अनेक विनंती अर्ज केले, सिडको, पोलाद व लोखंड बाजार समिती आणि पनवेल महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधून रस्ते निर्मिती बाबत वारंवार आंदोलने केली. अखेरीस प्रभुदास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करून पोलाद व लोखंड बाजार बंद करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. या साऱ्या संघर्षाची दखल घेत लोखंड व पोलाद बाजार समितीच्या माध्यमातून सतरा रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला बाजार समितीचे अध्यक्ष अशोक कुमार गर्ग, उपाध्यक्ष प्रशांत पारेख, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता डोंगरे, माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक गुलाबराव जगताप, बिस्मा चे अध्यक्ष लक्ष्मण बंसल, मेस्मा चे अध्यक्ष विक्रम भाई दोशी, सदस्य प्रल्हाद प्रजापती, पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड, शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक रविंद्र भगत, कंत्राटदार मनोहर पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर,
भीमशक्ती संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
लोखंड व पोलाद बाजार समितीचे सचिव श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीच्या विकास कामांच्या टप्प्यामध्ये 13 रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. तूर्तास सतरा रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे. मेसर्स ब्लू स्टार कन्स्ट्रक्शन आणि एस एस पाटील कन्स्ट्रक्शन अशा दोन कंपन्यांना या कामाचे कंत्राट देण्यात आलेले असून जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. पुढच्या टप्प्यात 23 रस्त्यांचे काम हाती घेण्यात येईल.2025 पर्यंत बाजार समिती आवारातील सर्व अंतर्गत रस्ते शंभर टक्के काँक्रिटीकरणाने पूर्ण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यात आलेले आहे.
छोटे खानी भूमिपूजन सोहळ्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता डोंगरे, गुलाबराव जगताप अशोक कुमार गर्ग यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.1982 साली मुंबईमधील कुर्ला दारूखाना येथील लोखंड व पोलाद बाजार व्यापाऱ्यांना सुटसुटीत पणे व्यवसाय करता यावा व शहरीकरणांमध्ये या व्यवसायाचा गळा घोटू नये म्हणून कळंबोली येथे 10,861 वर्ग मी. क्षेत्रात बाजार वसविण्यात आला. परंतु पूर्वी नामनिर्देशित सदस्य असणाऱ्या संचालक मंडळामुळे या बाजाराची फारशी प्रगती होऊ शकली नाही.2010 सालापासून लोकनियुक्त संचालक मंडळ बाजार समितीवर कार्यरत असल्यामुळे प्रगतीच्या दिशेने आश्वासक पावले टाकण्यात येत आहेत. त्याचाच परिपाक म्हणून या भूमिपूजन सोहळ्याकडे पाहिले जाते. रस्त्यांच्या बरोबरीनेच 50 ठिकाणी 100 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. त्यायोगे बाजार समिती आवारातील माथाडी कामगार, वाहतूकदार आणि व्यापारी यांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यात येईल.
प्रभुदास भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भूमिपूजन सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच बाजार समितीने पुढाकार घेऊन खिडूकपाडा गावाच्या सभोवतालचे सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतल्यामुळे बाजार समितीमधील संचालक मंडळाचे आभार प्रकट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.