वूमन सिंगल्स लॉन टेनिस मध्ये मिळविली चॅम्पियनशिप
पनवेल / प्रतिनिधी.
यंग डॉक्टर्स लीग फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित पहिल्या वहिल्या इंडियन डॉक्टर ऑलिम्पिक मध्ये पनवेलच्या डॉ. दामिनी बागुल हिने लॉन टेनिस मध्ये वुमन सिंगल चॅम्पियनशिप पटकावली आहे.
पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धांच्यात अकरा खेळ प्रकार समाविष्ट करण्यात आले होते. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते तर विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धांचे उद्घाटन संपन्न झाले होते. 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालखंडात पार पडलेल्या स्पर्धांमध्ये देशभरातील दीड हजारांहून अधिक डॉक्टर खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
लॉन टेनिस मध्ये लेडीज सिंगल प्रकारात चॅम्पियनशिप मिळवणाऱ्या डॉक्टर दामिनी बागुल हिने मिक्स डबल प्रकारात देखील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.डॉ. दामिनी तूर्तास पुण्यातून एम डी करत असून अथलेटीक्स ( शॉर्ट पुट ), वॉलीबॉल, क्रिकेट या खेळात देखील तिने विशेष प्राविण्य मिळविले आहे. याशिवाय कराटे या खेळ प्रकारात ती डबल डेन ब्लॅक बेल्ट होल्डर चॅम्पियन आहे. नृत्य स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा यामध्ये देखील पारितोषिके पटकावणाऱ्या डॉक्टर दामिनी हिच्या मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्त्वावर तूर्तास समाजातील सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच विविध खेळ प्रकारात दामिनी बागुल हिने सातत्याने नैपुण्य प्राप्त केले आहे. हे करत असताना देखील अकॅडमीक्सकडे जराही दुर्लक्ष न करता तिने सातत्याने चांगले मार्क मिळवले आहेत. चांगल्या गुणांनी बी ए एम एस पदवी प्राप्त केल्यानंतर आज एमडी चे पदव्युत्तर शिक्षण ती पूर्ण करत आहे. हे सारे केवळ तिच्या पालकांनी दिलेल्या पाठबळाच्या जोरावरती मी करू शकले अशी प्रतिक्रिया तिने आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली. खेळ प्रकारात करिअर करत असताना देखील आपण अकॅडमिक्समध्ये उत्तम प्रकारे उच्च शिक्षण घेऊ शकतो हा संदेश डॉक्टर दामिनी बागुल हिने समाजातील सगळ्या विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केला आहे.
लॉंन टेनिस या खेळप्रकारात डॉक्टर दामिनी हिला विशेष रस असून ती सध्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे कोच दिलीप नितुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तत्पूर्वी नेरूळ येथील कोर्टवरील सुप्रसिद्ध कोच नरेंद्र यांच्याकडे तिने बेसिक लॉन टेनिस चे धडे गिरविले आहेत. स्पोर्ट्स मेडिसिन या क्षेत्रामध्ये डॉक्टर दामिनी यांना कार्यरत राहण्यास आवडेल असे देखील त्या म्हणाल्या.यापूर्वी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स यांच्यावतीने 2020/21 या वर्षाकरिता बेस्ट स्पोर्ट्स स्टुडन्ट अवॉर्ड देखील तिने पटकावला आहे.
Be First to Comment