Press "Enter" to skip to content

येत्या विकेंडला मिळणार नाट्य रसिकांना एकांकिकांची मेजवानी

राज्यस्तरीय अटल करंडकची शुक्रवारपासून महाअंतिम फेरी

 राज्यभरातून निवड झालेल्या २५ एकांकिकांचा घेता येणार आस्वाद

सिने व नाट्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची लाभणार मांदियाळी

ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री मोहन आगाशे यांचा होणार गौरव 

पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी दिनांक ०८ ते १० डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी राज्यभरातून निवड झालेल्या २५ एकांकिकांचा आस्वाद नाट्य रसिकांना घेता येणार असून या स्पर्धेकरिता सिने व नाट्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची मांदियाळी लाभणार आहे. 

         पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या महाअंतिम फेरीचे उदघाट्न शुक्रवार दिनांक ०८ डिसेंबरला सकाळी ०८ वाजता होणार असून यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले तसेच भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर प्रमुख पाहुणे म्हणून तर आदरणीय उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे यांची उपस्थिती असणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक १० डिसेंबर सायंकाळी ०५ वाजता होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार असून सन्माननीय उपस्थिती म्हणून गौरव रंगभूमी पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, सुप्रसिद्ध उद्योजक विलास कोठारी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, लेखक व दिग्दर्शक राजन ताम्हाणे, अभिनेते लेखक व दिग्दर्शक संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते भरत सावले, सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अटल करंडक स्पर्धेचे ब्रॅण्ड अँबेसिडर सुप्रसिद्ध अभिनेता अजिंक्य ननावरे आदींची आदरणीय उपस्थिती असणार आहे. 

         यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतरही पारितोषिके आहेत, तर यंदाच्या गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक टीआयपीएल, सहप्रायोजक निल ग्रुप, तर सोशल मीडिया प्रायोजक इट्स माजा डॉट कॉम आहे. तीन दिवसात दर्जेदार अशा २५ एकांकिकांचा विनामूल्य लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व अटल करंडक स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ ठाकूर, अटल करंडक आयोजन कमिटी उपाध्यक्ष विलास कोठारी, स्पर्धा सचिव व सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी केले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.