Press "Enter" to skip to content

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आता नौसैनिकांच्या गणवेशावर

उत्तर रायगड भाजपा ने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार 

 पनवेल (वार्ताहर) 

काल ‘नौसेना दिनाच्या’ निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले. गेल्यावर्षी मोदी सरकारने नौसेनेच्या झेंड्यावर महाराजांची मुद्रा लावली होती. यावर्षीच्या नौसेना दिवसाच्या निमित्ताने आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर ही मुद्रा असणार आहे. या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि अभिमानाच्या आहेत, त्याबद्दल उत्तर रायगड जिल्हा भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.  

       छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नौसैनिकांच्या गणवेशावर लावण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याबद्दल आभार व्यक्त करताना ते पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय येथे बोलत होते. यावेळी भाजपचे पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, विनायक मुंबईकर, विश्वजित पाटील आदी उपस्थित होते. 

       अविनाश कोळी यांनी पुढे बोलताना सांगितले कि, स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेली सत्तर वर्षे आपल्या सशस्त्र सेनांचे दिवस दिल्लीतील एखाद्या लॉनवर साजरे होत असत. गेल्या सत्तर वर्षात प्रथमच एक पंतप्रधान आपल्या नौसेना दिवस साजरा करण्यासाठी सिंधुदर्गावर आले होते. मध्ययुगाच्या पूर्ण गुलामगिरीच्या इतिहासात एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी आरमाराचे महत्व ओळखले होते. ज्याच्याकडे आरमार त्यांची समुद्रावर सत्ता, त्या राज्याचे समुद्रकिनारे बळकट, आणि अंतिमतः जगाच्या व्यापाराचे दरवाजे त्या राज्याचे खुले होतात. असा सर्व विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे आरमार उभे केले. त्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक ठरतात. हे ओळखून नौसेनेच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेवरून प्रेरणा घेऊन नवीन मुद्रा लावण्यात आली होती. आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा असणार आहे. गुलामगिरीचे प्रतीक असलेली ब्रिटिशधार्जिणी मुद्रा आता भारतीय सैनिक वागवणार नाही. गेले सत्तर वर्षे स्वतंत्र भारताची नौसेना गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या ध्वजाला वंदन करत होती. मोदी सरकारने हे एक गुलामगिरीचे प्रतीक नष्ट करून देशवासियांना आणि नौसेनेलाही अभिमान वाटेल असा हा बदल करून दाखवला.  आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करणारे मोदी सरकार हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातले पहिले सरकार आहे. आधुनिक भारताची नौसेना या कोकणाच्या भूमीत, या महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण झाली. कालच्या नौसेनेच्या प्रात्यक्षिकांमध्ये एका युद्धनौकेचे नेतृत्व एका महिलेच्या हातात होते. मोदी सरकारने महिला सक्षमीकरणासाठी जितक्या गोष्टी केल्या आहेत तितक्या गेल्या सत्तर वर्षात कोणी केल्या नसतील. नौसेनेमध्ये सुद्धा नारी शक्तीला प्रोत्साहन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असेही अविनाश कोळी यांनी नमूद केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.