Press "Enter" to skip to content

नो मोअर जंटलमन्स गेम!!!

Cricket is a game of gentlemen असे म्हटले जायचे. सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकप मध्ये बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्या सामन्यातील एकंदरीत प्रकार पाहता हा खेळ आता जेंटलमन लोकांचा राहिला नाही असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. हा खेळ असला तरी ती स्पर्धा पण आहे. म्हणूनच सामन्यादरम्यान मैदानात शह – काटशह यांचे सुद्धा एक न दिसणारे द्वंद्व सुरू असते. स्पर्धेमध्ये जी कटूता येते ती तेथेच ठेवून मैदानाबाहेर येताना एकमेकांशी हस्तांदोलन करण्याची पद्धत आहे.कालच्या सामन्यांनंतर खेळभावनेतून हस्तांदोलने दिसली नाहीत. जी काही थोडीफार झाली ती औपचारिकता म्हणून झाली.कालच्या सामन्यात कोणाचे चुकले आणि कोणाचे बरोबर होते याच्यावरती बराच खल झालाय. जो जो ज्या ज्या टीमचा पाठीराखा तो तो त्या टीमची बाजू समर्थपणे मांडू शकेल. कुणी चौथ्या अंपायरला दोष देईल, तर कोणी मैदानावरच्या अंपायरला दोष देईल. या सगळ्यात विजय कोणाचा झाला? असे जर विचारले तर मी नक्कीच म्हणेन की विजय कोणाचा झाला ते सांगता नाही येणार पण क्रिकेट मात्र हरलंय….
वास्तविक दोन क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्यात स्पर्धा असावी अगदी तीव्र स्पर्धा असावी पण त्या स्पर्धेचा वापर करत त्या देशातील क्रिकेटचा स्तर उंचावला गेला पाहिजे ही आयसीसी ची प्रामाणिक भूमिका असते. इंग्लंड ऑस्ट्रेलिया मधली ॲशेस सीरीज असेल, भारत पाकिस्तान मधले रंजक सामने असतील किंवा न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचे फॅन वॉर असेल या सगळ्यात क्रिकेटच्या आत्म्याला धक्का लागलेला नाही.२०१८ साली श्रीलंकेने बांगलादेश दौरा केला होता त्यात नागिन डान्स करत या दोन देशांच्यात जी काही द्वेशाची बीजे पेरली गेलेत ती विषवल्ली चांगलीच फोफावत आहे. हा वेलू गगनावरी जाण्यापूर्वीच मुळापासून उपटावा लागेल.
बांगलादेश प्रिमियर लीग मध्ये या नागीण डान्स चा जन्म झालाय.या स्पर्धेत वेस्टइंडीज चा माजी कॅप्टन डॅरेन समी याने नजमुल इस्लाम एखाद्या सापासारखा आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. तेव्हापासून हा नजमूल इस्लाम विकेट घेतल्यानंतर बिलांशी नागिन निघाली… या गाण्यावर जनरली हळदीतले तमाम बेवडे नाचतात तशीच स्टेप करून दाखवतो.२०१८ साली निदास ट्रॉफीच्या सेमी फायनल मध्ये विकेट घेतल्यानंतर नजमुल पुन्हा नाचला. बांगलादेश किंवा श्रीलंका यातील खेळाडू अन्य देशांच्या खेळाडू विरुद्ध खेळत असता आनंद व्यक्त करताना नागीण डान्स करत नाहीत. या डान्स चा स्कोर सेटल करण्यासाठी सूडबुद्धीने त्याचा हिशोब ठेवला जातोय.तेव्हापासून या दोन देशांच्यात जो वणवापेटला आहे तो त्यांच्यातले क्रिकेट स्पिरिट खाक करून जाईल.
बांगलादेश प्रीमियर लीग ही अत्यंत खालच्या दर्जाची स्पर्धा आहे. आत्ताचा कर्णधार शाकिब अल हसन ती स्पर्धा स्वतःच्या बापाच्या मालकीची समजतो. अंपायर चा निर्णय पटला नाही तर लाथ मारून स्टंप उडवायची प्रथा या स्पर्धेत आहे. याच्या हुकूमशाही कारभारामुळे तमीम इकबाल सारखा क्वालिटी फलंदाज आज बांगलादेश टीमच्या बाहेर आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी मध्यस्थी करून देखील काहीही उपयोग झालेला नाही. अशा असंस्कारी व खिलाडु वृत्ती नसणाऱ्या खेळाडूंनी जर का अंजलो मेथ्यूस विरोधात अपील केले नसते तर मला नक्कीच नवल वाटले असते.नियम आहे म्हणून अपील केले असा युक्तिवाद तो सध्या करतोय, पण शेण खाणे हा काही गुन्हा नाही म्हणून भूक लागल्यावर कोणी सरसकट शेण खात नाही हे त्याला सांगावेसे वाटते.
आता या घटनेच्या तांत्रिक बाजू बद्दल काही गोष्टी समजून घेऊयात. मानवता हा दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून सुरक्षा या मुद्द्यास आयसीसीने अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. म्हणूनच क्लोज कीपिंग करताना हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर हेल्मेट च्या खाली नेक प्रोटेक्टर स्वट्रीप्स लावणे सुद्धा बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे एंजेलो ने तुटलेल्या हेल्मेट ऐवजी दुसरे हेल्मेट मागवणे योग्यच होते. तत्पूर्वी तो विकेटवर आला होता पण अंपायर कडून गार्ड घेतलेले नसल्यामुळे त्याला स्टान्स घेतला असे म्हणता येणार नाही. अंपायरच्या परवानगीने दुसरे हेल्मेट मागवले असते तरी देखील ते योग्य ठरले असते.
अंपायर कडे मायक्रो सेकंड मोजणारे इक्विपमेंट नव्हते त्यामुळे बाद देण्याचा निर्णय त्यांनी घेण्याऐवजी तो चौथ्या अंपायर कडे सोपवायला हवा होता म्हणजे केवळ मायक्रो सेकंड नव्हे तर अन्य तांत्रिक आणि तात्विक बाबी देखील तपासल्या गेल्या असत्या. एका टाईम आउट मुळे कटूता इतक्या थराला गेली आहे की सामन्यानंतर हस्तांदोलने झाली नाहीत. हे काही सज्जनांचे लक्षण नाही. दंड ठोठावयाचा असेल तर तो कुणा एका खेळाडूवर किंवा कर्णधारावर न लावता सरसकट दोन्ही संघांना त्याची किंमत मोजावी लागली पाहिजे.अन्यथा क्रिकेट इज नो मोअर जंटलमन्स गेम!!! असेच म्हणावे लागेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.