खारघरच्या बिझनेस बाईंडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने केला उपक्रमाला प्रारंभ
पनवेल / प्रतिनिधी.
पी एस एम अर्थात पनवेल स्मार्ट मम्मीज ही संस्था गृहिणींना पाठबळ देण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. चूल आणि मूल या पलीकडे प्रत्येक गृहिणीचे आपले एक अस्तित्व असते, तिची स्वतःची ओळख असते. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिच्यातील छंद, सुप्त गुण समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी पनवेल स्मार्ट मम्मीज ही संस्था अविरतपणे कार्यरत आहे. रविवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी पीएसएम संस्थेने बिझनेस बाईंडर्स या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवोदित उद्योजकांसाठी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
बिझनेस बाईंडर्स या संस्थेच्या संस्थापिका खारघरच्या काजल दर्शन या असून शितल ठक्कर या पनवेल स्मार्ट मम्मीज या संस्थेच्या प्रमुख संस्थापिका आहेत. नवोदित उद्योजकांना व्यवसायामध्ये स्थिरावण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी एका व्यासपीठाची गरज असते. अशा होतकरू उद्योजकांना एकत्र करून त्यांच्या व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्मिती होण्याच्या उद्देशाने सातत्याने बैठकींचे आयोजन केले जाते. काजल यांनी खारघर मध्ये अशा स्वरूपाच्या सलग सात बैठकांचे आयोजन केले आहे. पनवेल मध्ये प्रथमच पी एस एम या संस्थेच्या पुढाकाराने नवीन पनवेलच्या मुंबई कल्चरल कॅफेमध्ये रविवारी दुपारी पहिली बैठक संपन्न झाली. पनवेल स्मार्ट मम्मीज या संस्थेच्या सदस्य असणाऱ्या बीजल मीराणी यांनी पुढाकार घेऊन दोन संस्थांमध्ये समन्वय घडवून आणला. पहिल्या बैठकीसाठी वैद्यकीय क्षेत्र, आर्थिक गुंतवणूक आणि वित्त पुरवठा, एंटरटेनमेंट इव्हेंट, विधी व न्याय सेवा, पेस्ट कंट्रोल, कलाकार,वादक, सौंदर्य उत्पादने दागिने यांचा व्यवसाय करणारे अशा विविध क्षेत्रातील उद्योजकांनी उपस्थिती दर्शविली होती.
अशा प्रकारच्या बैठकांतून व्यवसायवृद्धी करता नवोदिकांना प्रसिद्धी करता यावी या उद्देशाने प्रदर्शन देखील आयोजित केले होते. मेघा भानुषाली यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांना संकल्पना विशद केली तर काजल दर्शन यांनी आगामी बैठकांबाबत उपस्थितांशी संवाद साधला. अल्पोपहार आणि चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
पनवेल स्मार्ट मम्मीज या संस्थेने यापूर्वी गृहिणींच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने विविध फॅशन शो चे यशस्वीरित्या आयोजन केले आहे. क्रीडा स्पर्धांचे देखील आयोजन केले आहे. तसेच सातत्याने वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना पाठबळ देत असल्यामुळे अल्पावधीतच ही संस्था प्रसिद्धीच्या शिखरावर पोचली आहे. लवकरच पी एस एम व्यावसायिक गृहिणींकरता समर्पित असणारे बिझनेस मॅक्झिन लॉन्च करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संस्थापिका शितल ठक्कर म्हणाल्या की आमच्या संस्थेची दखल घेतली जात आहे. अधिकाधिक सदस्य आमच्या संस्थेसोबत जोडल्या जात आहेत याचे निश्चित समाधान आहे परंतु आम्ही आजपर्यंत राबवलेल्या यशस्वी कार्यक्रमांमुळे हे सगळे होत आहे आणि याचे श्रेय आमच्या संस्थेच्या प्रत्येक मेंबरला मी देऊ इच्छिते. प्रत्येक सदस्याने त्याचे योगदान दिल्यामुळेच आम्ही आतापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकलो.
नवोदित उद्योजकांच्या पहिल्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या अनेक उद्योजकांनी या संकल्पनेचे भरभरून कौतुक केले. नवीन व्यवसाय करत असताना तो लोकांपर्यंत घेऊन जाणे गरजेचे असते त्यासाठी प्रचार आणि प्रसार करण्याकरता आर्थिक भार सहन करावा लागतो. पनवेल स्मार्ट मम्मीज आणि बिझनेस बाईंडर्स यांनी अशा पद्धतीने सातत्याने बैठका आयोजित केल्यास आम्हाला व्यवसाय वृद्धीसाठी मदत होईल अशा स्वरूपाची भावना उपस्थित उद्योजकांनी बोलून दाखविली.







Be First to Comment