मार्च 2025 मध्ये पहिली लोकल धावणार
पनवेल / प्रतिनिधी.
कर्जत ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP-3) अंतर्गत पनवेल ते कर्जत 29.6 किमी लांबीचा रेल्वे कॉरिडॉर बनवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावर तीन बोगद्यांचे काम सुरू आहे. रेल्वे मार्गावर वावर्ले,चौक आणि नढाळ या तीन ठिकाणी बोगदे असतील.यातील वावर्ले बोगदा हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर असणाऱ्या बोगद्यांच्यापैकी सगळ्यात लांब बोगदा ठरणार आहे.
कर्जत पनवेल ही उपनगरीय रेल्वे सेवा पनवेल पासून पुढे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत जोडली जाणार आहे. पनवेल रेल्वे स्थानकामध्ये सध्या तीन मोठी कामे सुरू आहेत. फलाट क्रमांक आठ ते बारा ची उभारणी,डायरेक्ट फ्रिट कॉरिडोर आणि कर्जत पनवेल उपनगरीय रेल्वे मार्ग. सध्या या ठिकाणी एकेरी रेल्वे मार्ग असून दुसऱ्या रेल्वे लाईन चे काम वेगात सुरू आहे. कर्जत पनवेल हार्बर लाइन मार्गे कर्जतवासीयांचा मुंबईपर्यंत प्रवास जलद गतीने होणार आहे. सेंट्रल लाईन मार्गे कर्जत ते सीएसटी या मार्गाची तुलना केली असता हार्बर लाईन मार्गे हे अंतर तब्बल 22 किलोमीटरने कमी असेल.यामुळे कल्याण जंक्शन मध्ये येणारा ताण देखील कमी होण्यास काही प्रमाणात मदत होईल.पनवेल मोहपे चिखले चौक कर्जत अशी पाच स्थानके या रेल्वे मार्गावर असतील. पनवेल ते कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाची लांबी 29.6 किमी असणार आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी सगळ्यात पहिले उपनगरीय रेल्वे आली. काही दशकांनी पनवेलमध्ये उपनगरी रेल्वे सेवा सुरू झाली. असे असले तरी देखील पनवेल ते कर्जत उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी अनेक दशकांचा कालावधी प्रतिक्षा करण्यात निघून गेला आहे. मार्च 2025 अखेरीस ही प्रतिक्षा संपणार आहे. या रेल्वे मार्गात दोन मोठे फ्लाय ओव्हर,15 रस्ते अंडर पास,7 रस्त्यांवरील पूल,तर अन्य 44 लहान मोठे पूल या मार्गावर असतील. या (MUTP-3) प्रकल्पाला अगस्ट 2016 मध्ये मान्यता देण्यात आली होती. या एकंदरीत प्रकल्पाकरिता 10,947 करोड रुपये खर्च येणार आहे.
यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वावर्ले बोगद्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. सात महिन्यांमध्ये एका बाजूच्या मार्गिकेचे ड्रिलिंग चे काम पूर्ण झाले आहे. या बोगद्याची लांबी तब्बल 2.6 किमी आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन च्या वतीने माहिती देण्यात आली की या बोगद्याचे काम हे सर्वात आव्हानात्मक परिस्थितीमध्ये करण्यात येत आहे. कर्जत पनवेल जुनी रेल्वे लाईन लगत या बोगद्याचे काम सुरू असल्यामुळे अत्यंत सावधानतेने हे काम करावे लागत आहे.56.87 हेक्टर जमिनीचे या मार्गासाठी भूसंपादन करण्यात आलेले आहे.4.4 हेक्टर सरकारी जमीन तर 9.13 हेक्टर वन विभागाच्या जमिनीचे संपादन करण्यात आलेले आहे. नवीन कर्जत पनवेल मार्गीकेच्यामुळे सेंट्रल लाईन वरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. अखेरीस पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वेची प्रतीक्षा संपत आल्याचे चित्र दिसून येत आहे.अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना मुंबईमध्ये ये जा करण्यास अतिरिक्त मार्ग उपलब्ध होईल. सध्या प्रगती एक्सप्रेस, पनवेल नांदेड एक्सप्रेस, पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस, लिंगपल्ली इंदोर, ग्वाल्हेर दौंड,एल टी टी हुबळी,पुणे सत्रगांची,एल टी टी सोलापूर अशा आठ गाड्या पनवेल कर्जत मार्गावरून धावतात. रेल्वे मार्ग कॉरिडॉर चे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या अनेक पटींनी वाढेल.






Be First to Comment