शिंदे फडणवीस पवार सरकारने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी देणार असल्याचे जाहीर केले होते. असे असले तरी गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असला तरी देखील या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. किंबहुना टोलमाफी कशा स्वरूपात मिळणार याबाबतीत नागरिकांच्यात संभ्रम आहे. म्हणूनच टोल माफीचे पासेस तातडीने गणेश भक्तांना देण्यात यावेत या स्वरूपाचा “रिमाइंडर” पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे.
कोकण प्रांत आणि गणेशोत्सव यांचे एक आगळे वेगळे भावनिक नाते आहे. नोकरी व्यवसाय या निमित्ताने कोकणवासीय मुंबई ठाणे अशा ठिकाणी निवास करतात परंतु त्याची नाळ मात्र त्याच्या जन्मभूमीशी जोडलेलीच असते. अन्य सणांचे बाबतीत तितकासा आग्रही नसणारा कोकणी माणूस गणेशोत्सव आणि होळी या दोन सणांकरता येईल त्या आव्हानाला लिलया पेलत कोकणात उत्सवासाठी पोहोचतो. कोकणी माणूस कितीही सोशिक असला तरी त्याच्या संयमाला देखील अंत आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याची वाट नेहमीच खडतर असते. त्याला आणखीन त्रास नको म्हणून सुदाम पाटील पुढे सरसावले आहेत. राज्य शासनाने टोलमुक्तीचे आश्वासन जरी दिले असले तरी प्रत्यक्षात अद्यापही पासेस वाटपाला सुरुवात नाही. शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आजपासूनच गणेश मूर्ती घरी आणण्याचे साठी कोकणवासीय व्यस्त असणार आहे त्यामुळे अगदी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पासेस न देता ते तातडीने देण्यात यावेत अशा स्वरूपाची मागणी सुदाम पाटील यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
याबाबतीत अधिक माहिती देताना सुदाम पाटील म्हणाले की, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट सुकर बनविण्यासाठी या सरकारचे मंत्री येऊन पाहणी करून गेले. परंतु प्रत्यक्षात मात्र मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यातूनच वाट काढत आहे. माझे मत आहे की असल्या खडतर वाटेवरती टोल लावताच कामा नये. मुंबईतून जाणारे काही नागरिक स्वतःची वाहने द्रुतगती महामार्गावरून कोल्हापूर मार्गे तळकोकणात घेऊन जातात. त्यांना टोल मुक्ती मिळाली पाहिजे. राज्य शासनाने याची घोषणा फार पूर्वीच केली होती त्याबद्दल मी त्यांचे आभार मानेन. परंतु विकेंड असल्यामुळे कित्येक नागरिक शनिवारपासूनच गणेशोत्सवाकरता प्रवास सुरू करतील त्यांना टोलमुक्तीचे पासेस दिले गेलेले नाहीत याची जाणीव मुख्यमंत्र्यांना व्हावी या हेतूने मी निवेदन पाठवले आहे.





Be First to Comment