देशपांडे पती-पत्नीची बंटी आणि बबली सारखी कार्यप्रणाली
१४ दिवसांची ठोठावली न्यायालयीन कोठडी
आर्थिक फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल असलेले दांपत्य अखेरीस पोलिसांच्या ताब्यात आले आहे.२३ऑगस्ट रोजी न्यायालयात आणले असता सन्माननीय न्यायालयाने त्यांना २५ ऑगस्टपर्यंत कोठडी बजावली होती. शुक्रवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी त्यांना पनवेल न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली आहे.
राजू देशपांडे आणि संगिता देशपांडे असे या दांपत्याचे नाव असून २०१६ सालच्या आर्थिक फसवणूक आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 प्रकरणानुसार त्यांच्यावर फिर्याद दाखल आहे.
तक्रारदार नितीन ईश्वर कांबळे यांनी पनवेल शहर पोलीस स्थानकात दाखल केलेल्या एफ आय आर क्रमांक ४१६/२०२३ नुसार देशपांडे पती-पत्नीला पनवेल पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले.त्यांना न्यायालयात हजर केले असता २५ ऑगस्टपर्यंत कोठडी बजावण्यात आली. पुनश्च कोर्टात सादर केले असता त्यांना 14 दिवसाचे न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आह.
याबाबत अधिक माहिती घेतली असता असे समजते की नितीन कांबळे यांना गाळा भाड्याने देण्याच्या उद्देशाने संगीता देशपांडे यांनी डीपोझिट पोटी रुपये एक लाख २५ हजार घेऊन देखील व्यवसाय करण्यास गाळा दिला नाही. अनेकदा विनंती करून देखील हे पैसे परत करण्यास संगीता देशपांडे,राजू देशपांडे आणि एजंट असणाऱ्या इमरान इस्माईल अन्सारी यांनी नितीन कांबळे यास अनेक वेळा टाळाटाळ केली.गाळा देत नसाल तर माझे पैसे परत करा,अशी विनवणी करण्यासाठी गेलेल्या नितीन कांबळे यास देशपांडे पती पत्नी यांनी जातीवाचक अनुद्गार काढल्याचे कांबळे यांचे म्हणणे आहे.
ज्या चॅनल प्लाझा या व्यावसायिक संकुलात या गाळ्यावरून वाद निर्माण झाला त्या ठिकाणी देशपांडे पती-पत्नी अनेक गाळ्यांवरती अवैध पद्धतीने कब्जा करून असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कुठल्याही प्रकारचे नोंदणीकृत दस्तावेज नसताना देखील देशपांडे दांपत्याने अनेक गाळे वर्षानुवर्षे भाड्याने देऊन पैसे लुबाडल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सदर वाणिज्य वापराच्या संकुलातील चेअरमन सेक्रेटरी व अन्य पदाधिकारी यांनी देशपांडे दांपत्या विरोधात पोलिस स्थानकात तक्रार केल्याचे देखील समजते. यापूर्वीच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना देखील अशाच पद्धतीने वारंवार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करून त्यांच्यावरती अंकुश मिळविण्याचा देशपांडे दांपत्याचा प्रयत्न असे. विद्यमान पदाधिकारी यांना देखील देशपांडे दांपत्याने आम्ही फार काळ आत राहणार नाही,बाहेर आल्यावर तुम्हाला बघून घेऊ,अशा स्वरूपाची मग्रुरी दाखविली,त्यामुळे या दाम्पत्याच्या पाठीमागे नेमकी कोणाची ताकत आहे? असा सवाल चॅनल प्लाझा येथील व्यापारी यांना पडला आहे.
देशपांडे पती-पत्नीच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाणे केस क्र २६/२०१४ भा द वी कलम ४५६,४६७,४७१,३४. खारघर पोलीस ठाणे केस क्र ८२/२०१५ भा द वी कलम ४२०,३४. पनवेल शहर पोलीस ठाणे ५०/२०१५ भा द वी कलम ४५२,४५७,५०६,३४.तसेच ४१६/२०२३. एन आर आय पोलीस ठाणे १७६/२०२२ भा द वी कलम ४२०,४०६,३४. वर्सोवा पोलीस ठाणे ४४/२०१६ भा द वी कलम ४२०, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई सिटी पोलीस ठाणे ७६/२०१५ भा द वी कलम ४२०,४७२,३४. लातूर जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाणे १५८/२०१५ भा द वी कलम ४२०,४०६,३४ नुसार गुन्हे दाखल आहेत. बहुतांश प्रकरणे आर्थिक फसवणुकीची असून नमूद दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या न्यायालयीन सुनावणी वेळेस आरोपी माननीय न्यायालयात वारंवार गैरहजर असल्याचे दिसून आले आहे.
आर्थिक फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमध्ये कित्येक तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतलेली नाही. कित्येक प्रकरणांच्यात देशपांडे दांपत्य हे पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे धाक निर्माण करत असल्याचे देखील स्थानिकांचे म्हणणे आहे.





Be First to Comment