कर्जाचे ओ .टी. एस. करताना नितीन देसाईंवर अन्याय, आणि जवळच्यांना हवी तशी सवलत…
सिटी बेल ∆ मुंबई ∆
बॉलीवूडमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जाच्या वसुलीकरिता सुरु असलेल्या एडेलविस एआरसीच्या जाचामुळे तणावाखाली येऊन दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी आत्महत्या केली. नितीनजीं हे लगान, देवदास इत्यादी प्रतिष्ठित चित्रपटांच्या कला दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे जगप्रसिद्ध कला दिग्दर्शक होते. त्यांनी साकार केलेल्या विलक्षण कलाकृती येणाऱ्या अनेक पिढ्या स्मरणात ठेवतील.
नितीन देसाई यांनी २०१६ मध्ये एडेलविस कंपनीकडून सुमारे १८० कोटी इतके कर्ज घेतले होते. हि रक्कम त्यांनी त्यांच्या कर्जत स्थित स्टुडिओ मध्ये नवीन सुधारणा करणे व इतर प्रकल्पांसाठी वापरली होती. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी सुमारे ८६ कोटींची परतफेड देखील केली होती. परंतु, कोविड महामारी तसेच व्यवसाय मंदावल्यामुळे ते २०२० आणि २०२१ मध्ये कर्जाचे हप्ते वेळेत भरू शकले नाहीत. यामुळे, कंपनीने त्यांच्यामागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला होता. मधल्या काळात तर त्यांनी त्यांचे पवई येथील आलिशान ऑफिस विकून एडेलविस ला थकीत रक्कम भरली होती.
सदरच्या त्रासाला कंटाळून नितीनजींनी एडेलविस कडे वन टाईम सेटलमेंट (ओ टी एस) ची मागणी केली. तसेच त्यांनी त्यांचे सोबत असलेले गुंतवणूकदार यांचीही हमी दाखवून दिली. परंतु, एडेलविस ने नितीनजींची ओ टी एस ची मागणी न स्वीकारता त्याच्यावर अन्यायकारक भूमिका घेऊन त्यांची कर्जत येथील स्टुडिओ ची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरु केली. आणि, हाच झटका सहन न करता आल्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आणि महाराष्ट्राने एक हिरा गमावला.
एडेलविस कर्जवसुलीकरिता एवढीच तत्पर असेल, तर मग त्यांनीच कर्ज दिलेल्या एका दुसऱ्या कंपनीला म्हणजेच नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक भूपेंद्र शाह यांच्या भूमिराज डेव्हलपर्स या कंपनीला वेगळी वागणूक आणि विशेष सवलतींची बरसात का? एडेलविस ने काही वर्षांपूर्ती भूमिराज डेव्हलपर्सला सुमारे २६० कोटींचे कर्ज दिले आहे. त्यापैकी फार थोड्या रकमेची परतफेड भूमिराज कंपनीने एडेलविस ला केली आहे. आणि, जाणून बुजून कर्ज थकीत केले आहे. आजपर्यंत त्यांची व्याज व इतर शुल्क धरून अंदाजे ४५० कोटी इतकी थकबाकी आहे. भूमिराजचे मालक भूपेंद्र शाह हे प्रख्यात विकासक असून ते सदर कर्ज भरू शकतात हे उघड सत्य आहे, एडेलविस ला देखील त्याची जाणीव आहे. मात्र, एडेलविस चे सर्वेसर्वा रशेष शाह आणि भूपेंद्र शाह या दोन शाहांमध्ये काय संबंध आहेत हा संशोधनाचा विषय आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे रशेष शाह याने विशेष लक्ष घालून भूपेंद्र शाह यांना त्यांच्या कर्जाची सेटलमेंट म्हणून एक आकर्षक सूट देऊ केली आहे. थकीत असलेली सुमारे ४५० कोटी हि रक्कम सेटल करून ३९० कोटी इतकी केली आहे, यातदेखील सुरवातीला १०० कोटी भरून राहिलेली थकीत रक्कम जी अंदाजे २९० कोटी आहे ती पुढील तीन वर्षात भरायची आहे, ती देखील केवळ ९% इतक्या सवलतीच्या व्याजदरात.
नितीन देसाई सारख्या ख्यातनाम मराठी उद्योजकाला त्याची कर्ज परतफेडीची इच्छा आणि क्षमता असूनदेखील त्यांना सापत्न वागणूक देऊन, वसुलीची कठोर प्रक्रिया अवलंबून, सगळे नियम धाब्यावर बसवून त्यांना एवढा मानसिक त्रास दिला कि ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले, त्यांनी आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलले.

हीच एडेलविस कंपनी भूपेंद्र शाह याच्या भूमिराज डेव्हलपर्स कंपनीला एवढी सवलत का देते. यामागे काही काळेबेरे आहे का? एडेलविस हि एक वित्त संथ असून ती भारतीय रिजर्व बँकेच्या परवान्या अंतर्गत व्यवसाय करते. कंपनीला कर्जाचे वाटप करण्यापासून वसुलीपर्यंत रिजर्व बँक आणि भारत सरकार यांनी आखून दिलेल्या सर्व अटी, नियम व धोरणांचे पालन करणे बंधनकारक आहे. तरी देखील हि कंपनी तिच्या दोन कर्जदारामध्ये अशी वेगळी आणि जाचक भूमिका कशी घेऊ शकते. यात रशेष शाह यांचे भूपेंद्र शाह याच्याशी काय लागेबांधे आहेत हे तपासले पाहिजेत.
एका मराठी उद्योजकाचा जाच आणि एका गुजराती व्यावसायिकाला विशेष सूट हा काय प्रकार आहे? अशी हळू आवाजात चर्चा मराठी समाजमनात चालू आहे. खरंतर नितीन देसाई आणि भूपेंद्र शाह याची भूमिराज डेव्हलपर्स या दोन्ही कर्ज खात्यांची सखोल चौकशी हि आवश्यक त्या तपास यंत्रणांकडून शासनाने करणे अत्यावश्यक आहे. सदर प्रकरणात महाराष्ट्र शासन हे स्वतः फिर्यादी होऊन तपासात जर रशेष शाह याने त्याच्याशी जवळीक असलेल्या भूपेंद्र शाह ला जर नियम डावलून गैरमार्गाने मदत केली असेल तर भूपेंद्र शाह आणि एडेलविस चे रशेष शाह यांच्या वर प्रवर्तन निर्देशनालय (ई डी) चौकशी व कठोर कारवाई करून नितीन देसाईंना न्याय देण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले पाहिजे. सखोल न्यायिक चौकशी केल्यास सत्य नक्कीच उघडकीस येईल असा विश्वास आहे.






Be First to Comment