Press "Enter" to skip to content


गटारीनिमित्त पार्टी,मुजोर झाली कार्टी

ज्याच्या फार्म हाऊस वर पार्टी केली त्यालाच केली जीवघेणी मारहाण

    पनवेल ( प्रतिनिधी)

  तालुक्यातील रिटघर गावचे रहिवासी असणारे तुकाराम दादू भोपी यांची चिंचवली गावाच्या हद्दीमध्ये शेत जमीन आहे. त्या ठिकाणी त्यांनी उभारलेल्या फार्म हाऊस वर त्यांच्या नातेवाईकांच्या परिचयाने आलेल्या मद्यपी मंडळींनी तुकाराम भोपी आणि त्यांचा मुलगा प्रलय भोपी यांना जीवघेणी मारहाण केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली आहे. पनवेल तालुका पोलीस स्थानकामध्ये ७ व्यक्तींवर विविध गुन्ह्यांची नोंद झालेली असून याबाबत अद्याप कुणालाही अटक झालेली नसल्याचे सूत्रांकडून समजते.
          याबाबत सविस्तर हकीकत अशी की तक्रारदार तुकाराम दादू भोपी आणि त्यांचे मोठे चिरंजीव प्रलय भोपी बुधवार दिनांक १२ जुलै रोजी शेतावरती भात लावणीची कामे करत होते. दरम्यान त्यांच्या शेत घरावर त्यांच्या मधल्या मुलाचे सासरे कैलास उलवेकर रा. मोर्बे यांच्या रेफरन्सने आलेले पनवेल नजीकच्या मोठा खांदा गावातील काही रहिवासी गटारी पार्टीच्या निमित्ताने एन्जॉय करत होते. दिवसभरात साधारण ३० च्या आसपास मंडळी या पार्टीमध्ये सहभागी झाली असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास प्रलय भोपी हे आम्ही आमची कामे आटपून घरी निघालो आहोत, त्यामुळे तुम्ही देखील तुमचे आवरते घ्या! या स्वरूपाची विनंती करण्यासाठी गेले होते. परंतु त्यावेळी तेथील लोकांनी भरपूर मद्यपान केले असल्यामुळे ते उलटे प्रलय भोपी यास दरडवू लागले. आरोपींमधील बाळू उर्फ रुपेश भगत याने उच्च आवाजात अद्वातद्वा बोलत प्रलय याच्या कानाखाली मारली. तेथील झटापट पाहता रुपेश भगत याच्या साथीदारांनी हातापायाने आणि बाजूला पडलेल्या लोखंडी सळईने प्रलय यास मारण्यास सुरुवात केली. मुलाला वाचवण्यासाठी तुकाराम भोपी गेले असता दारूच्या नशेत असणाऱ्या सहा ते सात लोकांनी तुकाराम भोपी यांना देखील हातापायाने आणि लोखंडी सळईने मारहाण केली. जखमी अवस्थेत कसेबसे आपला जीव वाचवत या पिता-पुत्रांनी तेथून पोबारा केला. तेथून पळून जाण्यात यश मिळाल्यामुळे तुकाराम भोपी आणि त्यांचे सुपुत्र प्रलय भोपी वाचले, अन्यथा दारूच्या नशेत मारहाण करणाऱ्यांच्या हातून काहीही होऊ शकले असते.
       तुकाराम  आणि प्रलय भोपी यांनी धाकटा चिरंजीव प्रीतम आणि भोपी यांच्या मावस भावाचा मुलगा संजय पाटील यांच्या मदतीने वैद्यकीय उपचार मिळविला. त्यानंतर उत्तर रात्री तुकाराम भोपी यांच्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलीस स्थानकामध्ये भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ३२४,५०४,५०६,४२७,१४३,१४७,१४८ नुसार गुन्हा दाखल झाला असून रुपेश भगत, स्वप्निल भोईर, आतिश भोईर, उमेश भगत, कनव भोईर, विशाल दुंदरेकर, विघ्नेश भोईर सर्व राहणार मोठा खांदा हे आरोपी आहेत. सदर प्रकरणात सब इन्स्पेक्टर लाला भाऊसाहेब लोणकर हे तपास अधिकारी म्हणून पुढील तपास करत आहेत.
      आरोपी नुसते मारहाण करून थांबले नाहीत तर त्यांनी फार्म हाऊस वरील सीसीटीव्ही, खुर्च्या, टेबले यांची रागाच्या भरात नासधूस केली. एकंदरीतच पनवेल परिसरामध्ये पार्टी कल्चर फोफावताना दिसत आहे. गटारी अमावस्या आणि ३१ डिसेंबर यांना जणूकाही राष्ट्रीय सणांचे महत्त्व प्राप्त झाल्याच्या आविर्भावात मद्यपींच्या रंगेल पार्ट्या झडत असतात. या प्रकरणात तर गटारी काही संपेना, बेवडे पाहुणे ऊठेना! असेच म्हणावे लागेल. यामध्ये तक्रारदार तुकाराम भोपी आणि त्यांचे चिरंजीव प्रलय यांना मात्र नाहक आर्थिक आणि शारीरिक नुकसान सहन करावे लागले.
       

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.