माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी
पनवेल (वार्ताहर)
स्मार्ट शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर शहरात गोर गरिबांच्या शिक्षणाची आबाळ होत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर येत आहे. खारघर सेक्टर ३४ येथील फरशीचापाडा गावातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. गळके छत, पावसाच्या पाण्याने वर्गात होणारा चिखल, अंधाराचे साम्राज्य यामुळे येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शिक्षण देणारे शिक्षक यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खारघर सेक्टर ३४ मधल्या फरशीचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेला भूखंड उपलब्ध करून देऊन शाळेचे पुर्नवसन करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची मागणी पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे.
येथील शाळा धोकादायक स्थितीत असल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू शकते. ही शाळा खासगी मालकीच्या जागेत असल्याने दुरुस्ती साठी पनवेल महानगरपालिका परवानगी देत नाही,त्यामुळे जिल्हा परिषदेकडून आलेला निधी परत गेला आहे. शाळेची दुरुस्ती न केल्याने आज धोकादायक स्थितीत शाळा आहे. याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. स्मार्ट व्हिजन ठेवणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात शाळेची ही दुरवस्था झाली असल्याने पनवेल महानगरपालिकेने या शाळेसाठी नवीन भूखंड उपलब्ध करून या शाळेचे पुनर्वसन करावे तसेच तूर्तास तात्पुरती सोय म्हणून खारघर प्रभाग कार्यालयात शाळा स्थलांतरित करण्यात यावी. अशा स्वरूपाच्या मागणीचे निवेदन पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी दिले आहे.
Be First to Comment