प्रितम म्हात्रे यांचा पालिका प्रशासनाला परखड सवाल
नवीन पनवेल (प्रतिनिधी)
पनवेल महानगरपालिकेने सिडकोच्या विभागातील उद्याने हस्तांतरित करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.पनवेल महानगरपालिकेच्या अखत्यारीत आल्यानंतर या उद्यानांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्थाच नसल्यानेच अनेक शोभेची झाडे सुकून गेली आहेत, पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणी झाली नाही त्यामुळे उद्यानांची वाताहात होत आहे.
माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी दुरावस्थेत असणाऱ्या उद्यानांचा वाली कोण? असा परखड सवाल केला आहे.नुकताच पावसाळा सुरू झाला आहे सदर परिस्थितीत आयुक्तांनी पाहणी करून नव्याने वृक्षारोपण आणि इतर व्यवस्था पूर्ववत होईल याची दक्षता घ्यावी अशी प्रितम म्हात्रे यांनी सूचना मांडली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने नवीन पनवेल सेक्टर ३ येथील उद्यान व परिसरातील बहुतांश उद्यानांमध्ये रात्री दारु पिण्याचे प्रकार सर्रास पणे सुरू असतात.अंधाराचा फायदा घेऊन मद्यपान करण्याचे प्रकार वाढत आहेत. मद्यपान केल्यानंतर त्या बाटल्या तशाच फेकुन द्यायच्या, वेळप्रसंगी बाटल्या फोडून काचेचा सडा निर्माण करायचा असले प्रकार वाढीस लागत आहेत. परिसरातील फूटपाथवर मातीचे ढिग तसेच रेबिट ठेवले आहे त्यामुळे पादचाऱ्यांना चालायचे कुठून हा प्रश्न निर्माण होत आहे. उद्यानात रात्रीच्या वेळी दिवे सुरू नसतात.अर्थातच त्यामुळे अनैतिक धंदे सुरू असतात
असले प्रकार टाळण्यासाठी आणि अंधाराचा फायदा घेऊन भविष्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षारक्षक २४ तास नेमण्यात यावा. अशी मागणी देखील प्रितम म्हात्रे यांच्याकडून करण्यात आली आहे. याठिकाणी त्वरित लाईट व्यवस्था सुरू करण्यात यावी. असे निवेदन देत असतानाच आयुक्त साहेबांनी हा प्रश्न गांभीर्याने हाताळला पाहिजे व तातडीने पाहणी दौरा आयोजित करून उद्यानांची भकास अवस्था संपुष्टात आणली पाहिजे अशा प्रकारचे मत प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले.




Be First to Comment