अधीक्षक अभियंत्यांसोबत होणार वादळी बैठक
नागरिकांना लिखित स्वरूपात समस्या घेऊन येण्याचे केले आहे आवाहन
पनवेल (प्रतिनिधी)
पनवेल तालुक्यात विजेचा अखंडित पुरवठा मिळणे जवळजवळ अशक्य झाले आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, विद्युत प्रवाहाचे वोल्टेज सातत्याने वर खाली होणे, वीज देयकांच्यात होत असलेली वाढ, वीज प्रवाह वाहून येणाऱ्या तारांच्या नाजिकची वृक्ष छाटणी सदोष असणे अशा समस्यांनी ग्राहक हैराण झाले आहेत. समाजाच्या सर्व स्तरांतून तक्रारीचा सूर उमटत आहे.
पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार वीज वितरणचे अधिक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत शनिवार दि.०८ जुलै २०२३ रोजी दुपारी ०३ वाजता खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल मध्ये विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
वीज पुरवठा व त्या अनुषंगाने तक्रारी लक्षात घेता त्याचे निवारण होण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस येताना वीज ग्राहकांनी, विविध सोसाट्यांनी केलेल्या तक्रारींचा अर्ज तसेच लेखी स्वरूपात समस्या लिहून सोबत घेऊन वेळेवर बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने बैठक होणार असून विद्युत पुरवठा करणाऱ्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार असल्याची चर्चा घडत आहे. या बैठकीच्या मुळे नागरिकांच्या विद्युतपुरवठा निगडित समस्या सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत म्हणूनच आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतल्याबद्दल उपभोक्त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.




Be First to Comment