लोणावळा परिसरात असलेल्या लोहगडावर हजारो पर्यटक अडकून पडल्याची बातमी निश्चितच धक्कादायक आहे. रविवार असल्याने गडावर वर्षाविहार करण्यासाठी हजारो जण आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. अक्षरशः पाऊल ठेवायला देखील जागा नसल्याचं एका व्हिडिओ मधून समोर आलेले आहे. सुदैवाने या घटनेत चेंगराचेंगरी झालेली नाही. अन्यथा अनर्थ घडला असता.
सतत कोसळत असलेल्या पावसामुळे लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये छोटे- मोठे धबधबे वाहू लागले आहेत. वर्षा सहलीचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी मुंबई ठाणे आणि पुणे परगण्यातील पर्यटक लोणावळ्याची पहिली पसंती म्हणून निवड करतात.वर्षाविहारासाठी लोणावळा, खंडाळा, लोहगड, भाजे, कार्ला या ठिकाणी वीकेंडला पर्यटकांची झुंबड उडते. नियोजनाचा अभाव या निमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आलेला असून असून लोणावळा शहर असेल किंवा ग्रामीण पोलिस असेल यांनी अशा घटनांकडे लक्ष देण्याचं गरज आहे. अन्यथा चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा जीव देखील जाऊ शकतो. पर्यटकांनी देखील शहाणपण दाखवण्याची गरज आहे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांनी जाणे टाळावे. या साऱ्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे वर्षा सहलीच्या निमित्ताने काही विघ्न संतोषी पर्यटकांकडून होणारा उन्माद, बेशिस्तपणा यामुळे वर्षा सहलीचा निखळ आनंद घेणारे मात्र विनाकारण पिचले जातात.
पनवेल परिसरातील आप्पासाहेब वेदक जलाशय (गाढेश्वर धरण) आणि पांडवकडा धबधबा या ठिकाणी शनिवार रविवार पर्यटकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सरसकट बंदी करण्यात येते. आपत्ती नियोजनाच्या सिल्याबस नुसार रुल आऊट स्टँपेड ! ऑप्शन स्वीकारत आठ ते दहा ठिकाणी चौक्या बसवून पर्यटकांना माघारी धाडले जाते. पोलीस प्रशासनाने इतकी काळजी घेतल्यानंतर सुद्धा त्यांची नजर चुकवून जाणारे महाभाग असतात. काही हट्टाला पेटलेले पर्यटक “वरून” फोन करायला लावतात आणि पर्यटन स्थळी स्वतःची वर्णी लावतात. वृत्तपत्र वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर,प्रतिनिधी किंवा राजकारणी मंडळी यांच्या परिचयाचा किंवा “आपला खास” असा एखादा माणूस बंदोबस्तावर असल्यास पर्यटन स्थळी त्यांना सुद्धा मुभा असते.
मुळात या मोजक्याच तीन चार ठिकाणी निसर्ग आहे का? पाऊस सगळीकडे सारखाच पडतो, परिसर तेवढाच निसर्गरम्य होतो. एकाच सुप्रसिद्ध ठिकाणी गर्दी करून त्याच ठिकाणचा आनंद घेण्याचा अट्टाहास कशासाठी? अशाने आपण पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक वापराची यंत्रणा यावर गरजेपेक्षा जास्त दबाव टाकत आहोत ही भावना लोकांच्या मनात कधी येणार? पर्यटकांच्यात एक प्रवर्ग असतो ज्याला निसर्गरम्य ठिकाणी जाऊन दारू प्यायची असते. कोणी दारू प्यारी अथवा न प्यावी हा ज्याच्या त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग झाला. परंतु वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आपल्या मद्यपनाचा त्रास होऊ नये हा विचार मद्यपींच्या मनाला जराही शिवत नाही. दारूच्या बाटल्या तिथेच टाकायच्या, बहुतांश वेळा त्या फोडून टाकायच्या यात काय आनंद मिळतो ?हे देवालाच ठाऊक. वर्षा सहलीच्या ठिकाणी जाताना आणि येताना बेदारकारपणे वाहने चालवत मस्ती करणाऱ्यांचा एक प्रवर्ग नेहमीच पाहायला मिळतो. किंचाळत ओरडत जोरजोरात गाडीतील म्युझिक सिस्टीम लावून फिरताना असल्या महाभागांना कुठला आनंद मिळतो हे त्यांनाच ठाऊक. वर्षा सहलीच्या ठिकाणी साग्रसंगीत भोजन झाल्यानंतर आपल्या उष्ट्या खरकट्याचा नैवेद्य निसर्ग देवाला दाखवणाऱ्यांचा प्रवर्ग तर सगळीकडेच पाहायला मिळतो. अशा ठिकाणी पर्यटकांची गरज म्हणून अनधिकृतपणे पान टपऱ्या, कोल्ड्रिंक्स चे स्टॉल, भाजलेल्या मक्याच्या कणीसांची दुकाने, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या असे जोडधंदे सुरू होतात.
मोकळ्या हिरव्यागार शिवारावर फिरावं, एखादी अनोळखी पायवाट पावलाखाली घ्यावी, शेतामध्ये राबणाऱ्यांकडे पाहात बसावं, तुडुंब भरून वाहणाऱ्या नदीच्या किनारी उभे राहून पाण्याचा जलदगती प्रवास पहावा,पोहोचण्याचे कुठलेही ठिकाण निश्चित न करता भिजत भिजत वाट नेईल तिकडे चालत जावं. हे सारं केल्याने वर्षाविहाराचा,वर्षा सहलीचा निखळ आनंद मिळू शकतो हे उन्मादी पर्यटकांना कोण शिकवणार? उन्मादी पर्यटकांना शिस्त लावणे जिकरीचे काम आहे. पण त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेत आपण मात्र आपल्या वर्षा सहलीचा, वर्षाविहाराचा आनंद घेऊयात.



Be First to Comment