Press "Enter" to skip to content

इंग्लंडला हार सहन होत नाही…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट मॅचला जेवढं खुन्नसचे वलय येत नाही त्याच्या पाचपट तेच वलय इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एशेस मालिकेला असतं. दोन सामने झालेत, दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये इंग्लंडला हरवले आहे. इंग्लंडला पहिला वहीला वर्ल्ड कप मिळवून देणारा त्यांचा सुपरहिरो बेन स्टोक्स सध्या त्यांचा कर्णधार आहे. दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये त्याच्या लढाऊ वृत्तीचे त्याने प्रदर्शन घडविले. पण योग्य साथ न मिळाल्याने दुसऱ्याही सामन्यात त्याला हार पत्करावी लागली आहे.
        सध्या इंग्लंडच्या टीमला न्यूझीलंडचा ब्रँडन मॅकक्युलम  कोच म्हणून धडे देत आहे. टेस्ट मॅच मध्ये सुद्धा आक्रमकपणा अंगीकारत बेझ बॉल पॉलिसी त्यांनी स्वीकारली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर बेन स्टोक्स सोबत उभे राहून मॅच एक हाती जिंकून देण्याची क्षमता असणारा धडाकेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्या वादग्रस्त रन आउट मुळे सध्या क्रिकेट जगतातील दिग्गज स्टेटमेंट वॉर खेळत आहेत.
        माझे प्रामाणिक म्हणणे आहे की ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर ॲलेक्स कॅरी याने दाखवलेली समय सूचकता आणि जॉनी बेअरस्टो याला केलेले रनआउट याला शंभर पैकी शंभर मार्क द्यायलाच पाहिजेत. सामना झाल्यानंतर ब्रिटन मधल्या प्रसिद्धी माध्यमांना सामोरे जात असताना ऑस्ट्रेलिया चा कर्णधार कमिंन्स याला एका पत्रकाराने थेट प्रश्न केला की तुझा क्रिकेट स्पिरीट वर विश्वास आहे का? तोही फाडकन म्हणाला होय? त्यानंतर खिलाडू वृत्तीनेच्या नजरेतून जॉनी बेअरस्टो याच्या रन आउट कडे पाहण्यावरून ब्रिटन मधील तमाम माजी खेळाडू आणि पत्रकार ऑस्ट्रेलियाला नैतिकतेचे डोस पाजू लागले आहेत.
            मुळात इंग्लंडमध्ये खेळत असताना इंग्लंड टीम त्यांच्या पोषक वातावरणाचा परिपूर्णपणे फायदा घेत प्रतिस्पर्धीला नामोहरम करण्याची व्युहरचना करत असते. वास्तविक जगातील कुठल्याही खंडात क्रिकेट खेळत असताना त्या त्या भौगोलिक परिस्थितीचा स्थानिक संघ फायदा घेत असतो. या वेळच्या ॲशेस मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया अत्यंत जाहीर पद्धतीने काही पॉलिसी  घेऊन संघ उतरवत आहे. उदाहरणार्थ जिमी अँडरसनला विकेट न देणं, पारंपरिक पद्धतीने विकेटवर नांगर टाकून खेळणे, गोलंदाजी करताना पाच ओव्हर पेक्षा जास्त ओव्हरचा स्पेल एका गोलंदाजाला न देणे वगैरे.. या उलट इंग्लंड संघ मॉडर्न टेस्ट क्रिकेट पॉलिसीज अंगीकारतय. थोडक्यात बेसिक्स ला चिकटून राहत इंग्लंडचे दात इंग्लंडच्या घशात घालण्याची ऑस्ट्रेलियाची पॉलिसी अद्यापतरी यशस्वी ठरली आहे.
      राहिला विषय जॉनी बेअरस्टो याच्या रन आउट चा! तर इंग्लंडला इंग्लंडमध्ये त्यांचेच दात त्यांच्या घशात घातल्याचा सगळ्यात जास्त राग आलाय. इंग्लंडचा आजचा थयथयाट हा सरळ सरळ हार न पचल्याचे द्योतक आहे. गोलंदाजांनी टाकलेला चेंडू डेड होण्यापूर्वी आपले क्रिझ सोडू नये हे शाळकरी विद्यार्थ्याला सुद्धा माहित असते. अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टो याला हे ठाऊक नव्हते असे म्हणणे मूर्खपणाचे लक्षण ठरेल. अत्यंत तणावपूर्वक परिस्थितीमध्ये भांबावलेला जॉनी बेअरस्टो आपण सगळ्यांनीच टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहिला. आज या ऐतिहासिक रन आऊट ची चर्चा होत असताना मी ऑस्ट्रेलियन विकेटकीपर अलेक्स कॅरी याचे जाहीरपणे अभिनंदन करेन.
        खिलाडू वृत्तीची जेव्हा केव्हा चर्चा होईल तेव्हा त्याबाबत संभाषण करण्याचा इंग्लंडला कुठलाही अधिकार नसेल हे मी स्पष्टपणे नमूद करतो. 2019 वर्ल्ड कप फायनल मध्ये न्युझीलँड विरुद्ध दोन सुपर ओव्हरच्या तमाशाचा रंगलेला फड आपण सगळ्यांनी पाहिला. सुपर ओव्हर मध्ये दुसऱ्यांदा दोन्ही संघ समसमान ठरले तर चौकार षटकार जास्त मारलेला संघ विजेता ठरतो हा  शोध मला, त्या नियमाचे अनुषंगाने लागला..असो! पण यात बेन स्टोक्स याच्या न भूतो न भविष्यती फलंदाजीचे श्रेय मला त्याच्यापासून हिरावून घ्यायचे नाही. तरीही याच खेळीत फलंदाजाच्या अंगाला लागून गेलेला ओव्हर थ्रो चा चौकार इंग्लंड संघाने खेळाडू वृत्ती डोळ्यासमोर ठेवून स्वीकारण्यास नकार द्यायला हवा होता. तसेच झाले असते तर आज कदाचित वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडचा संघ ठरला असता.
त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टीने खिलाडू वृत्ती वरती इंग्लंड संघाने किंवा त्यांच्या पाठीराख्यांनी चर्चा करणे त्यांना शोभत नाही. या रन आउट प्रकरणात तर शंभर टक्के चूक इंग्लंडच्या फलंदाजाची आहे. चतुर चाणाक्ष ऑस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षकाने जर त्याचा फायदा उचलला असेल तर यात त्या यष्टीरक्षकाचे यथोचित कौतुक झालेच पाहिजे.
        हेडींगले, ओल्ड ट्रॅफर्ड,आणि ओव्हल वर पुढचे तीन सामने रंगणार आहेत. वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा जिमी अँडरसन त्याच्या कॉलम मध्ये स्पष्टपणे लिहून गेलाय की गेल्या दहा वर्षाच्या करिअरमध्ये बॅक टू बॅक क्वाएट गेम्स कधीच गेले नव्हते. सगळा दोष त्यानी खेळपट्ट्यांच्या माथी मारलाय. पण त्याच खेळपट्टीवर स्टार्क, कमिन्स ,ब्रॉड आणि अगदी नवखा असणारा यंग यांनी विकेट काढून दाखवल्यात. परफॉर्मन्स देता आला नाही की कारण देणे हे स्टार खेळाडूला शोभत नाही. या उलट दुसऱ्या मॅचच्या दुसऱ्या इनिंग मध्ये नॅथन लायन सारखा हुकमी स्पिनर जायबंदी असताना देखील ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या संघाचा ऑल आउट करून दाखवला. अकरा मध्ये निवड झालेली असून सुद्धा एक गोलंदाज कमी घेऊन आम्ही खेळतोय याचा पुसटसा सुद्धा उल्लेख ऑस्ट्रेलियाने कुठे गेला नाही.
       ॲशेस मालिका आणि वादंग यांचे अगदी घट्ट नातं असतं. यंदाचे वर्ष सुद्धा अपवाद नाही.
या सगळ्या गदारोळात एक महत्त्वाचा मुद्दा जाता जाता पुन्हा मांडतो तो म्हणजे तमाम जगताला नैतिकता आणि शिस्त यांचे डोस पाजणाऱ्या इंग्लंडला हार सहन होत नाही…
      

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.