(जून महिन्यातील तिसरा रविवार ) १८ जून २०२३
वंदन परंपरेतील मातृवंदन हे निखालस अग्रक्रमाचे आहे .त्यानंतर मस्तक नमवावेसे वाटते ते पितृवंदनासाठी. याचीच जाण ठेऊन अमेरिकेत दरवर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार "मदर्स डे" म्हणजेच
” मातृ दिन” तर जून महिन्यातील तिसरा रविवार हा “फादर्स डे” म्हणजे ” पितृ दिन ” म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो .
अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या एका उपनगरात राहणाऱ्या सोनोरा स्माट-डॉड या स्त्रीचे वडील विल्यम ज्याक्सॉन स्मार्ट हे युध्दात मारले गेले होते .त्यांनी आपल्या सहा मुलांचा सांभाळ केला होता .आपल्या पित्याच्या स्मरणार्थ काहीतरी करण्याची श्रीमती डॉड यांची इच्छा होती . १९०९ साली आपल्या पित्याच्या जन्मतारखेच्या सुमारास सर्व पित्यासाठी काही तरी विशेष समारंभ अथवा सेवा सुरू करण्याचे त्यांनी ठरवले .ही कल्पना सर्वाना खुप आवडली .त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कॉल्व्हिन कुलिम यांनी १९२४ मध्ये "फादर्स डे" हा राष्ट्रीय उत्सव म्हणून जाहीर केला .१९७२ मध्ये त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी "फादर्स डे " हा राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येईल असे जाहीर केले .सोनोरा डॉड यांनी सुचवले की, ज्यांचे वडील हयात आहेत त्यांनी या दिवशी लाल गुलाब परिधान करावा आणी ज्यांचे वडील हयात नाहीत त्यांनी पांढरा गुलाब परिधान करावा . अमेरिकेत " फादर्स डे " साजरा केला जातो मग " मात्रू देवो भव पितृ देवो भव.. मानणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीने श्रावणातल्या अमावास्येला म्हणजे पिठोरी अमावास्येला ” मातृदिन ” मानून आईची दाखल घेतली परंतु पिता यापासून वंचित झाला . पितृ पंधरवडा पाळला जात असला तरी त्या पंधरवड्यात मृत झालेल्या सर्वच पितरांची पूजा केली जाते . जिवंत बाप दुर्लक्षितच राहतो . आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व असतो . आई जरी जन्म देत असली तरी मुलांचे रक्षण, पोषण, व शिक्षण हया तीनही जबाबदाऱ्या पित्याच्याच असतात .मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास पित्याच्याच छत्राखाली होत असतो .याचे उदाहरण द्यायचे झाले तर वयाच्या चौदाव्या वर्षी पुरुषांनाही चितपट करणारी कौशल्या वाघ, वयाच्या अठराव्या वर्षी टेनिसपटू म्हणून जागतिक किर्ती मिळवणारी सानिया मिर्झा, बुध्दीबळ या खेळात जागतिक किर्ती संपादन करणाऱ्या खाडिलकर भगिनी इतकेच काय १९९५ च्या दरम्यान दहावीच्या परीक्षेत बोर्डात प्रथम येणारी वालचंद नगर येथील कु .विनया अरुण हतवळणे बारावीच्या परीक्षेतही बोर्डात पहिली आली आणी त्याच वर्षी तिचा भाऊ आनंद दहावीच्या परीक्षेत बोर्डात पहिला आला त्याच्या मागे त्यांचे वडील डॉ .अरुण हतवळणे यांनी घेतलेली मेहनत बघितली की पित्याचे महत्व पटते . मुलाच्या व्यक्तीमत्वावर आईच्या ममतेचा जितका प्रभाव असतो तितकाच पित्याच्या कर्तुत्वाचा प्रभाव अधिक असतो .आई जर मुलांचे पाय मजबूत करत असतील तर वडील त्याला महत्वाकांक्षाचे पंख मिळवून देतात .मुलांना ठेच लागली तर त्यांच्या तोंडुन " आईग " असे उद्गार निघतात परंतु समजा चालतांना
समोरून गाडी अंगावर आली तर घाबरून ” बापरे ” असे सहज उद्गार येतात .असे असले तरी बापाच्या विषयी कुठेच फारसं बोललं जात नाही उलट “सांगे वडिलांची किर्ती तो एक मूर्ख ” असं समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटलं आहे .म्हणून की काय अनेक साहित्यिकांनी आई बद्दल खुप काही लिहिलं आहे परंतु वडिलांबद्दल व .पु .काळे यांचा अपवाद वगळता कोणी फारशी दखल घेतली नाही . साने गुरुजी यांनी ” शामची आई ” हे पुस्तक प्रसिध्द केले ते पन्नास वर्षांनंतरही लोकप्रिय ठरले आहे .त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्री उत्तम कांबळे इत्यादी साहित्यिकांनी आई च्या कर्तुत्वाची दखल घेतली आहे . ज्येष्ठ साहित्यिक व .पु .काळे यांनी मात्र ” वपु सांगे वडिलांची किर्ती ” हे पुस्तक प्रकाशित करून बापाला न्याय मिळवून दिला आहे . आई आणी वडील ही कुटुंबाच्या रथाची दोंन चाकं असतील तर दोघांची सारखी दखल घेतली तरच " मातृ देवो भव पित्रू देओ भव " ही आपली भारतीय संस्कृती आहे हे सिध्द होईल .
दिलीप प्रभाकर गडकरी
कर्जत जि .रायगड




Be First to Comment