महेंद्र घरत यांनाच मावळची उमेदवारी देण्यासाठी रायगड मधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्षांना साकडे
सिटी बेल विशेष / पनवेल.
मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांनाच उमेदवारी द्या! असे साकडे पदाधिकारी आणि विविध सेलच्या प्रमुखांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना घातले. लोकसभा उमेदवारीच्या दृष्टीने चाचपणी करण्याकरता २ व ३ जून रोजी झालेल्या टिळक भवनातील बैठकांच्या दरम्यान महत्त्वाच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महेंद्र घरत यांच्या नावाचा एकमताने पुकार केला आहे.
रायगड जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मोदी लाटे मध्ये देशभरात काँगेसच्या अनेक बालेकिल्लांना धक्का लागला असला तरी देखील रायगड मध्ये बुरुज ढासळण्याची प्रक्रिया तत्पूर्वीच सुरू झाली होती. रायगड जिल्ह्यातील काँग्रेसला महेंद्र घरत यांच्या रूपाने डॅशिंग अध्यक्ष प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा नवचैतन्याची झळाली प्राप्त झाली. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, विकास कामांचा धडाका, आणि सक्रिय राजकारणातील प्रगल्भता या शिदोरीवर महेंद्र घरत यांनी अल्पावधीतच एक सजग आणि सक्षम नेतृत्व म्हणून अढळस्थान पक्क केलं. त्यांच्यातील नेतृत्व कौशल्य हेच मावळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा खासदार दिल्लीला पाठवू शकतो हा विश्वास प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निर्माण झाला आहे. म्हणूनच मुंबई येथील टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये रायगड जिल्ह्यातील प्रमुख नेते, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक सेल, ओबीसी सेल,सेवा दल या साऱ्यांचे प्रमुख पदाधिकारी यांनी महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून महेंद्र घरत यांची एकमुखाने पाठराखण केली.
मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी जर का सुनियोजित पद्धतीने एकत्रित होत निवडणूक लढवली तर गेली सलग तीन टर्म शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ सहज जिंकता येईल. २००८ साली मावळ लोकसभा मतदारसंघाची स्थापना करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील तीन आणि रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश या मतदारसंघात करण्यात आला. निर्मितीपासून गेली तीन टर्म शिवसेनेचा खासदार येथून निवडून येत आहे. अर्थातच तिन्ही टर्म शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होती. पंधराव्या लोकसभेमध्ये शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आझम पानसरे यांचा पराभव केला. सोळाव्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राहुल नार्वेकर यांचा पराभव केला. तर १७ व्या लोकसभेत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांच्या तगड्या आव्हानाला लीलया नमावत दुसऱ्यांदा खासदार होण्याचा सन्मान पटकावला. दरम्यानच्या कालखंडात शिवसेनेच्या मध्ये झालेल्या वादळामुळे ती दुभंगली आहे. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आणि निवडणूक आयोगाच्या मान्यतेने शिवसेना हे नाव आणि अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले आहे. तूर्तास विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत. परंतु कोकणपट्ट्यातील मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्राबल्य जास्त दिसून येते. सोबत शेतकरी कामगार पक्षाची तगडी साथ मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सक्षम प्रचार केला तर महेंद्र घरत त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडू शकते.
महाविकास आघाडीचा विचार केला असता सलग तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पराभवाचे तोंड पाहिले आहे. शेतकरी कामगार पक्षाने देखील एकदा आपला उमेदवार देऊन चाचपणी करून पाहिली आहे. परंतु या खेपेला ठाकरे गटातील कडवट शिवसैनिकांचे बळ महाविकास आघाडी सोबत असल्याने महेंद्र घरत यांनी निवडणूक लढविल्यास यांच्या गळ्यात विजयाची माळ पडू शकते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशभरात काँग्रेससाठी एक सकारात्मक वातावरण निर्मिती केलेली आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघ आणि कर्नाटक राज्यातील विधानसभा निकाल पॅटर्न पाहता काँग्रेस एक सक्षम पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकांना सामोरा जाणार आहे. त्यातच रायगड जिल्ह्यातील कर्जत उरण पनवेल या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये महेंद्र घरत यांचा वैयक्तिक करिष्मा मॅच विनर ठरणार आहे. शिवाय आगामी साऱ्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढविण्यावर एकमत झाले आहे. महेंद्र घरत यांच्या इतका दुसरा सक्षम नेता ही निवडणूक लढविण्यासाठी मावळ मतदार संघात दिसून येत नाही. अर्थातच या साऱ्यामुळे महेंद्र घरत यांनी आता मिशन दिल्ली हातामध्ये घ्यावे अशी कार्यकर्त्यांच्यात भावना आहे.
Be First to Comment