Press "Enter" to skip to content

नामदेव गोंधळी यांनी काढलेल्या मोर्चात धडाडल्या सर्वपक्षीय तोफा

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही

ज्येष्ठ काँग्रेस नेते जी आर पाटील यांचा खणखणीत इशारा

पनवेल /प्रतिनिधी.

       वावंजे येथील शेतकरी नामदेव शंकर गोंधळी यांनी जमीन फसवणूक प्रकरणात काढलेल्या मोर्चामध्ये रायगड जिल्ह्यातील मुलुख मैदानी तोफ म्हणून समजले जाणारे जी आर पाटील कडाडले. नामदेव गोंधळी तर फक्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत अशा हजारो शेतकऱ्यांवरती भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अन्याय केला आहे त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही असे प्रतिपादन यावेळी जी आर पाटील यांनी केले.
      याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की नामदेव शंकर गोंधळी यांच्या कुटुंबाच्या मालकीची वावंजे येथे सर्वे क्रमांक 123/2 वर 38.70 गुंठे जमीन आहे. कौटुंबिक वाटणी नुसार दक्षिणेकडील 18.70 गुंठे क्षेत्र त्यांच्या मालकीचे असून उत्तर दिशेकडील 17.70 क्षेत्र त्यांच्या काकांच्या मालकीचे आहे.नामदेव गोंधळी यांनी 20 नोव्हेंबर 2019 रोजी केलेल्या वचन चिठ्ठीनुसार सिद्धार्थ भल्ला यांना त्यांच्या हिश्याची जमीन विकण्याचा निर्णय घेतला.4 लाख 35 हजार रुपये प्रति गुंठा दराने सदरचा व्यवहार ठरला. परंतु सिद्धार्थ भल्ला यांनी सदर जमीन विक्रांत संसारे यांच्या नावाने विकत घेण्याचे निश्चित केल्यामुळे हे खरेदीखत नामदेव गोंधळी आणि विक्रांत संसारे यांच्या दरम्यान नोंदणीकृत करण्यात आले. दरम्यानच्या कालखंडात नामदेव गोंधळे यांना कर्करोगाने ग्रासले. परंतु त्यांच्या कंपनीतील सहकार्यांनी त्यांना दिलेल्या अत्यंत दर्जाच्या वैद्यकीय उपचारांमुळे ते या कर्करोगातून बरे झाले. स्वतः नामदेव शंकर गोंधळी असे म्हणतात की माझ्या माऊलींनी मला अक्षरशः दुसरा जन्म प्रदान केला आहे. बरे होऊन परतल्यावर त्यांच्या असेल निदर्शनास आले की त्यांची व त्यांच्या काकांच्या हिश्याची अशी संपूर्ण जमीन संसारे यांच्या नावावरती करण्यात आलेली आहे. या गोष्टीमुळे नामदेव गोंधळी व त्यांचे चुलत बंधू यांच्यामध्ये अनाठाई वादंग निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली. तेव्हा गेली साडेतीन ते चार वर्षे अथक पाठपुरावा करत नामदेव शंकर गोंधळी यांनी या सगळ्या प्रकरणांमध्ये असणारे गावातील भुरटे एजंट, भूमिलेख कार्यालयातील अधिकारी, आणि तलाठी कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी यांची अभद्र युती चव्हाट्यावर आणली. अखेरीस प्रशासनाला सात बारा वरील नोंदी पूर्ववत कराव्या लागल्या.
           महानगरपालिकेसमोरील महात्मा गांधी उद्यान येथून मोर्चाला सुरुवात होणार होती. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी मोर्चा अडवून केवळ शिष्टमंडळाने उपायुक्त कार्यालयात चर्चेसाठी चलावे अशी विनंती केली. जी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नामदेव गोंधळी जमीन फसवणूक प्रकरणात भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी घेऊन शिष्टमंडळाने नवी मुंबई पोलीस मुख्यालय अंतर्गत परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त यांचे वतीने पनवेल तालुका पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना निवेदन सादर केले. यावेळी सदर प्रकरणात लक्ष घालून नामदेव गोंधळी यांना न्याय मिळवून देऊ असे पोलिसांच्या वतीने आश्वासन देण्यात आले.
          सर्वपक्षीय पाठिंबा मिळवत नामदेव गोंधळी यांनी मोर्चाची जोरदार तयारी सुरू केली होती. परंतु केवळ केलेला अर्ज म्हणजेच परवानगी! असे समजता येणार नाही असे सांगत पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने उभारलेले स्टेज आणि बैठक व्यवस्था उचलून नेली. यावर व्यक्त होताना जी आर पाटील म्हणाले की आम्ही प्रशासना विरोधात भांडण करीत नाही. परंतु ज्या पद्धतीने भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे तो खपवून घेतला जाणार नाही.
              नामदेव गोंधळी यांना जमीन फसवणूक प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी जी आर पाटील, शिवकर ग्रामपंचायतला जिल्हा तसेच तालुका पातळीवर आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळवून देणारे माजी सरपंच अनिल ढवळे, उपसरपंच देवचंद पाटील, माजी उपसरपंच जिनेश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जब्बार शेख, रोशन मुंबईकर, ज्येष्ठ पत्रकार तथा शिव अभ्यासक सुधाकर लाड, अशोक बाळाराम पाटील, संजय भगत आदी मान्यवरांच्या समवेत ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.