अग्रलेखाचे शिर्षक वाचल्यानंतर कोण हि मत्स्यगंधा? आता जन्माला आली आहे म्हटल्यावर ती २५ वर्षांची होणारच ना? असे प्रश्न तुमच्या मनात उमटले असतील. पण ही कुणी ललना नसून कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ११८६ किलोमीटर अखंड धावणारी पहिली एक्सप्रेस ट्रेन अर्थात मत्स्यगंधा एक्सप्रेस. एक मे २०२३ रोजी मत्स्यगंधाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. ठीक पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे एक मे १९९८ रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांच्या शुभहस्ते या ट्रेनला शुभारंभ करण्यात आला.देशाच्या दळणवळण इंडस्ट्रीच्या इतिहासात ही ट्रेन सुरू होण्याने एक फार मोठे प्रगतीचे पाऊल टाकले गेल्याची नोंद त्या निमित्ताने होणार होती. महाराष्ट्रातील मुंबई आणि कर्नाटकातील मंगळूर या दोन शहरांना जोडणारी ही रेल्वेगाडी खरंतर दोन राज्यांच्या प्रगतीचा दुवा ठरली आहे.

समुद्र तटालगत रेल्वे मार्गावरून सुळसुळणाऱ्या या गाडीला मत्स्यगंधा या व्यतिरिक्त दुसरे समर्पक नाव सापडू शकलं नसतं. या नावाला दुजोरा दिला गेला तो त्यानिमित्ताने फळफळणाऱ्या मत्स्य व्यवसायाने. कोस्टल कर्नाटका हे क्षेत्र मच्छीमारीसाठी ओळखले जाते. येथील समुद्रकिनाऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखण्यात काही यांची यश प्राप्त झाले आहे. येथे मासळीचे सारेच प्रकार मुबलक प्रमाणात आढळतात अर्थातच त्यामुळे या ठिकाणी मुबलक मासेमारी होते. ती विविध बाजारपेठांच्यात पोहोचविण्यासाठी मत्स्यगंधा एक्सप्रेस मोलाची कामगिरी बजावते. मत्स्यगंधा एक्सप्रेस ही तिच्या तीन क्वालिटीज मुळे ओळखली जाते. ठरल्या वेळी प्रयाण व आगमन,वेग आणि आरामशीर प्रवास. अर्थातच वेग आणि वक्तशीर प्रवास हे पावसाळ्याचे चार महिने इकडे तिकडे होतात. तसे तर कोकण रेल्वे मार्गावर सगळ्याच गाड्यांना पावसाळ्यात आपला वेग कमी करावा लागतो आणि त्याचा थेट परिणाम वेळापत्रकावर होतो. पण वैभववाडी येथे १९ वर्षांपूर्वी झालेल्या भयंकर अपघातानंतर दुर्घटना से देर भली! असेच म्हणावे लागेल.
गेल्या २५ वर्षात मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या अविरत सेवेमुळे दोन्ही राज्यातील उद्योगांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत सक्षम पाठबळ मिळते. मत्स्य व्यवसायाबरोबरच कोस्टल बेल्ट मध्ये निघणाऱ्या अन्य नैसर्गिक उत्पादनांची ने आण करण्यासाठी देखील ही रेल्वेगाडी महत्त्वाची भूमिका बजावते. आंबा, फणस, काजू,सुपारी, मसाल्याचे पदार्थ, कोकम, फुले,तांदूळ,जांभूळ,भाज्या अशा उत्पादनांना या गाडीच्या निमित्ताने अत्यंत कमी किमतीमध्ये बाजारपेठांपर्यंत पोहोचणे शक्य झालं. रस्ते मार्गे उत्पादन बाजारपेठांच्यात पोहोचविण्यात जितका खर्च दळणवळणासाठी होतो त्याच्या निम्म्या पेक्षा कमी किमतीत तो ट्रेन मार्गे होतो. त्यात मत्स्यगंधा एक्सप्रेस चा पल्ला आणि वेग पाहता ती व्यापाऱ्यांची पहिली पसंती बनली आहे.

उद्योग शेती यासोबतच विविध कारणांनी केल्या जाणाऱ्या पर्यटन कामी देखील मत्स्यगंधा पहिली पसंती ठरते. कोस्टल कर्नाटका टूर, मुरुडेश्वर येथील सुप्रसिद्ध शंकर मंदिर, कारवार, तळ कर्नाटक येथे पर्यटनासाठी जाणाऱ्यांच्या या गाडीच्या आरक्षणासाठी झुंडी पडतात. मुंबई आणि कर्नाटक राज्यातील वस्तीगृहांच्यात राहून शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्गाची सुद्धा हीच गाडी पहिली पसंती ठरते. अवघ्या सोळा तासात मुंबई ते मंगळूर अंतर कापत असल्यामुळे कार्यालयीन कामानिमित्त या पट्ट्यात प्रवास करणाऱ्यांची मत्स्यगंधा ही आवडती गाडी ठरते. तसे पाहायला गेले तर मुंबई ते मंगळूर हे अंतर रस्ता मार्गे ४५ तासांचे आहे. पण मत्स्यगंधा एक्सप्रेस हे अंतर अवघ्या सोळा तासात पार करते.
एक मे रोजी उडुपी रेल्वे स्थानकावर, आणि कर्नाटकातील बहुतांश रेल्वे स्थानकावर या गाडीचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. लोको पायलट, गार्ड्स यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गाडीचे स्वागत करण्यात आले आणि मोठ्या जल्लोषात प्रत्येक स्टेशनवर तिला अलविदा करण्यात आले. हे सारे होत असताना महाराष्ट्र मात्र या गाडीच्या महात्म्यापासून आणि या सगळ्या सोहळ्यापासून अनभिज्ञ होता. खरंतर महाराष्ट्र दिन सगळीकडे साजरा होत होता कामगार दिनाचे कार्यक्रम झडत होते. पण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला वैभव प्राप्त करून देणारी आणि तमाम कामगारांना त्यांच्या कार्यस्थळी आणि घरी पोहोचवणारी ही गाडी मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या ध्यानातून निसटून गेली होती. केवळ जनताच नव्हे तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रशासन सुद्धा अशा प्रकारच्या कार्यक्रमात रस घेऊ इच्छित नव्हते. गेला बाजार त्यांनी एखादे पत्र काढून तरी मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या रजत वर्धापन दिनाची ची दखल घ्यायला हवी होती.





Be First to Comment