Press "Enter" to skip to content

लवकरच धावणार एल टी टी ते थिविम समर स्पेशल ट्रेन

सुट्टीसाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर

आज पासून आरक्षण झाले खुले

      उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणातल्या गावी जाणाऱ्यांना कोकण रेल्वेने एक विशेष भेट दिली आहे. सहा मे पासून एक जून पर्यंत एक विशेष उन्हाळी ट्रेन चालविण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी ही गाडी कोकण रेल्वे मार्गे थिवीम
पर्यंत चालविण्यात येणार आहे. ही समर स्पेशल ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. रेल्वेच्या सर्व अधिकृत संकेतस्थळावरून तसेच सर्व तिकीट खिडक्यांवर आजपासून या गाडीचे आरक्षण खुले करण्यात आले आहे.
       ०११२९/०११३० असा गाडीचा क्रमांक असून सहा मे ते ३१ मे दरम्यान शनिवार सोमवार व बुधवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटेल. रात्री २२.५० वाजता सुटणारी गाडी सकाळी ११.३० वाजता थिवीम येथे पोहोचेल.तर सात मे ते एक जून दरम्यान थिवीम येथून हीच गाडी रविवार मंगळवार व गुरुवारी सुटेल. सायंकाळी १६.४० वाजता सुटणारी गाडी पहाटे ४ वाजून पाच मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, खेड,चिपळूण, सावंतवाडी, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड,वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड येथे थांबा घेईल.

या गाडीला टू टियर एसी आणि फर्स्ट क्लास एसी एकत्रित एक डब्बा, टु टियर एअर कंडिशन एक डब्बा, थ्री टियर एअर कंडीशन चे दोन डबे, सेकंड क्लास स्लीपर कोच चे दहा डबे, दोन जनरल बोग्या, एक एस एल आर, जनरेटर व्हॅन असे १८ डबे असतील.

कोकण रेल्वे मार्गावरती समर स्पेशल ट्रेन धावत असल्याचे निश्चितच समाधान आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी आणखीन एका ट्रेनचा पर्याय उपलब्ध झाला आहे. परंतु जशी समर स्पेशल ट्रेन चालवली जात आहे त्याप्रकारे हीच गाडी प्रत्येक सणांच्या वेळी देखील विशेष ट्रेन म्हणून चालविण्यात यावी. गणपती, दिवाळी, शिमगा या सणांना  चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणातल्या गावी जात असतात त्यांना स्पेशल ट्रेनचा लाभ घेता येईल,दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा स्पेशल ट्रेन्स ची घोषणा किमान एक महिन्यापूर्वी करण्यात यावी तसेच किमान एक महिन्यापूर्वी त्यांचे आरक्षण खुले व्हायला हवे तरच प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करता येईल.
— अभिजित पाटील
सेंट्रल रेल्वे झेड आर यू सी सी सदस्य.
कार्याध्यक्ष,पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.