पर्वा एक बातमी वाचण्यात आली.पुण्यात ए आर रेहमान च्या लाईव्ह कन्सर्ट ला पोलिसांचा इंगा दाखवण्यात आला. “पोलिसांनी बंद पाडला रहमान चा कार्यक्रम” अशा निगेटिव्ह मथळ्याखाली या बातम्या सगळीकडे फिरू लागल्या. वास्तविक नियमानुसार रात्री दहानंतर ध्वनीक्षेपकावर जर कार्यक्रम सुरू असेल तर तो बंद केलाच पाहिजे! या नियमाने जर पोलिसांनी ए आर रहमानला पोलीसी खाक्या दाखवला असेल तर त्यांनी त्यांचे कर्तव्य केले असे माझे स्पष्ट म्हणणे आहे. ए आर रहमान त्या ठिकाणी काही सामाजिक कार्यक्रमाचे दळण दळत नव्हता. रग्गड पैसे मोजून, बक्कळ तिकीट लावून त्याच्या नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे झाले त्याच्यावर विधवा विलाप करण्यापेक्षा पुण्यातील कर्तव्यदक्ष पोलिसांचे अभिनंदन करावे, ते जास्त संयुक्तिक होईल आणि पोलिसांना एक प्रकारचे पाठबळ मिळेल.

ए आर रहमान हा एक प्रथितयश संगीत दिग्दर्शक आहे. भारंभार वाद्य प्रकार वापरून त्यांची सरमिसळ करून एक सुंदर सांगीतिक कलाकृती घडविण्याचा त्याचा एक टिपिकल पॅटर्न आहे. त्याच्या संगीतानं तरुणाईला भुरळ घातली आहे. अगदी लहान थोरांपासून सगळ्यांनाच त्याची गाणी आवडतात. हे सारे कितीही सत्य असले तरी सुद्धा तो भारताच्या संविधानापेक्षा किंवा देशाच्या दंडविधानापेक्षा मोठा नाही. कारवाई करायला आलेल्या अधिकाऱ्यांनी अंडरस्टँडिंग दाखवली नाही असा त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात येतोय. मी हेतू पुरस्सर अग्रलेखात अंडरस्टँडिंग हा इंग्रजी शब्द वापरत आहे. कारण त्याचा मराठी अर्थ आणि इंग्रजी अर्थी वापर यात जमीन आसमानाचा फरक होऊ शकतो. पोलीस खात्यात नव्याने बदली होऊन आलेल्या अधिकाऱ्याचे वर्णन जर साहेब समजूतदार आहेत,सहकार्य करतात असे केले तर त्याला एक वेगळा अर्थ होतो. आणि साहेबांकडे अंडरस्टँडिंग आहे, को-ऑपरेटिव्ह सुद्धा आहेत असे म्हटले तर त्याला नकारात्मक छटारुपी वेगळा अर्थ प्राप्त होतो… असो!
पुण्यामध्ये ए आर रहमान च्या कार्यक्रमावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा अनेक फोन आले असतील. वास्तविक जी कार्य तत्परता आणि कर्तव्यदक्षता त्या अधिकाऱ्याने आणि त्याच्या संपूर्ण टीम ने दाखवली, राज्यभरातील पोलिसांकडून हेच अपेक्षित असते. कित्येकदा अधिकाऱ्यांची भूमिका सुद्धा खूप प्रामाणिक असते, पण शेवटी कोणाचं ना कोणाच तरी अंडरस्टँडिंग मध्ये येते. आपण कारवाई करतोय तो कार्यक्रम ए आर रहमान नामक देशातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाचा आहे याचे भान त्या अधिकाऱ्याला देखील होते. परंतु परिणामांची तमा न बाळगता अशा बड्या प्रस्थांना भिडण्यासाठी जिगर असावी लागते आणि ती दाखविल्याबद्दल त्या अधिकाऱ्याचे मनःपूर्वक अभिनंदन!

कुठल्याशा चित्रपटात एक संवाद फार मनस्पर्शी होता. पोलिसांनी जर “मनात आणलं” तर देवळाच्या बाहेरून साधी चप्पल सुद्धा चोरीला जाणार नाही. पण अवतरण चीन्हातील “मनात आणलं” या संकल्पनेला शाश्वत रूप देता येऊ नये म्हणून अनेक अदृश्य हात राबत असतात. हेच अदृश्य हात समाजाचे खरे शत्रू आहेत. अंडरस्टँडिंग प्रस्थापित करू पाहणाऱ्या या अदृश्य हातांना सगळ्यात पहिले छटावं लागेल, तरच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या खात्याला स्वायत्तता प्राप्त होईल.




Be First to Comment