Press "Enter" to skip to content

१ मे दिनविशेष

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा…

१ मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. पहिलं कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. दुसरं कारण आहे या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मे दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे.

 आज आपल्या राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. विशेष म्हणजे आज गुजरात दिवसही आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

         तत्कालीन केंद्र सरकारने `१९५६ च्या राज्य पुनर्गठन अधिनियमानुसार अनेक राज्यांची स्थापना करण्यात आली. भाषावर प्रांतरचना करण्यात आली. कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. तर तेलुगू भाषिकांसाठी आंध्रप्रदेश,मल्याळम बोलणाऱ्यांसाठी केरळा राज्याची स्थापना करण्यात आली. तामिळ बोलणाऱ्यांसाठी तामिळनाडूची निर्मिती झाली.त्यावेळी मराठी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्यांसाठी वेगळं राज्य निर्माण करण्यात आले नाही. गुजरात आणि महाराष्ट्र हा मुंबई प्रांताचाच एक भाग होता.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली. जाळपोळ, मोर्चे आणि आंदोलने सुरू होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५ जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मा झाले. त्यानंतर केंद्र सरकारने १ मे १९६० रोजी मुंबई प्रांताला बॉम्बे पुनर्गठन अधिनियम १९६० नुसार महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. दोन राज्यांच्या निर्मितीनंतर मुंबई आपल्यालाच मिळावी म्हणून मराठी आणि गुजराती भाषकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावरही आंदोलन सुरू झाले.मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक राहत आहेत, भाषावार प्रांतरचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग त्या राज्याला दिला पाहिजे हे ठरलं आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, असा आग्रह मराठी भाषकांनी धरला. तर मुंबईची जडणघडण आमच्यामुळेच झाल्याचा दावा करत मुंबई गुजरातला देण्याची मागणी गुजराती भाषकांनी केली होती. पण मराठी भाषकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली.

कामगार दिनाची कहाणी…

१ मे ला महाराष्ट्र दिन का म्हणतात हे तर आपल्या प्रत्येकालाच माहित असतं, पण कामगार दिनाबद्दल फारच कमी माहिती असते. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

१७ व्या शतकाच्या मध्यापासून सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याच बरोबर नवीन समस्या पण निर्माण झाल्या होत्या. त्यातलीच एक समस्या होती कामगारांची. औद्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला, पिळवणूकीला सुरुवात झाली. त्यावेळी कामाचे तास हे तब्बल १५ तास होते. कामगारांचं जीवन हलाखीचं होतं, त्यांना त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नसे. कामगारांच्या अशा परिस्थितीतूनच पुढे जगाचा इतिहास बदलला.

       कामगारांची पहिली मागणी होती ८ तासांच्या कामाची. पुढे चळवळीलाही ‘eight -hour day ‘ या नावाने ओळखलं जाऊ लागलं. अशी पहिली मोठी चळवळ उभी राहिली ऑस्ट्रेलिया मध्ये. २१ एप्रिल १८५६ रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळाला. तेव्हापासून ऑस्ट्रेलियामध्ये २१ एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.ऑस्ट्रेलिया मध्ये जे घडलं त्यापासून धडे घेत १ मे १८८६ रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी  कामासाठी ८ तासांची मागणी केली. मागणी पाठोपाठ संप आणि मोठ्याप्रमाणात मोर्चे निघाले. शिकागो मधल्या आंदोलनात पोलिसांमुळे ६ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कामगारांच्या मनातला राग आणखीनच वाढला. याचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर बॉम्ब फेकण्यात आले. ७ पोलीस आणि ४ नागरिकांचा यात मृत्यू झाला. याला जबाबदार म्हणून ८ लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा झाली. या फाशीने त्यावेळी जगभर संतापाची लाट उसळली होती. कारण असं म्हणतात की या ८ जणांपैकी एकानेही बॉम्ब फेकला नव्हता.अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर १९८० ला १ मे रोजीच कामगारांचं आंदोलन यशस्वी झालं. योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी आणि ८ तास काम या मागण्या मान्य झाल्या. तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला मे दिन पण म्हटलं जातं.तसं पाहायला गेलं तर प्रत्येक देशानुसार कामगार दिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, पण बऱ्याच ठिकाणी १ मे या दिवसाला मान्यता मिळाली आहे. खुद्द अमेरिकेत सप्टेंबर मधला एक दिवस  कामगार दिन म्हणून ठरवण्यात येणार होता. पुढे कामगारांच्या समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी शिकागोच्या दुर्घटनेला श्रद्धांजली म्हणून १ मे या दिवसाची निवड केली.१९०४ साली ॲम्स्टरडॅम येथे झालेल्या सेकंड इंटरनॅशनल संघटनेच्या परिषदेत संपूर्ण जगातील कामगार संघटनांना हे आवाहन करण्यात आलं की १ मे हा दिवस 8-hour day म्हणून साजरा करावा.

भारतात कामगार दिनाची पाळेमुळे १९२३ सालापर्यंत मागे जातात. भारतातल्या ‘लेबर किसान पार्टी’ने १ मे १९२३ रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. याचवेळी भारतात पहिल्यांदाच लाल झेंडा कामगार दिनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.