Press "Enter" to skip to content

द रॅशनलिस्ट मर्डर्स’ पुस्तकाचा मुंबईत प्रकाशन सोहळा संपन्न

डॉ.दाभोलकर, गौरी लंकेश आदी पुरोगाम्यांच्या हत्यांच्या भरकटलेल्या तपासाचे सत्य उघड करणारे पुस्तक ! 

मुंबई / वार्ताहर

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार जणांची हत्या झाल्यानंतर या चारही प्रकरणात तपास यंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला त्यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हा तपास भरकटला होता. ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ हे पुस्तक लिहिण्यासाठी शेकडो संदर्भ पडताळले आणि 10 हजारांहून अधिक पानांची आरोपपत्रे वाचली. एकंदरीत तपासातील अनेक त्रुटी, गरीब आणि सामान्य घरातील युवकांना गोवण्याचे षडयंत्र तसेच विरोधी विचारसरणी असणाऱ्या संस्थेला बदनाम करण्याचे प्रयत्न या पुस्तकात मांडले आहेत.या पुस्तकातून मी कोणाच्या बाजूने नाही, मी सत्याच्या बाजूने आहे. तपासाचे सत्य मी सांगितले आहे असे स्पष्ट मत डॉ. अमित थडानी यांनी केले. शीव (सायन) येथील षण्मुखानंद सभागृहात 29 एप्रिल या दिवशी डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून इतिहासतज्ञ, लेखक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. रतन शारदा आणि विशेष पाहुण्या म्हणून अभिनेत्री केतकी चितळे उपस्थित होत्या. या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. या खटल्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठांची बाजू मांडणारे हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर हेही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिप्तेश पाटील आणि ॲड. खुश खंडेलवाल यांनी केले. डॉ. अंजना थडानी यांनी कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात आभारप्रदर्शन केले. 

       डॉ. अमित थडानी पुढे म्हणाले, नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणात दर 2-3 वर्षांनी काही लोकांना पकडण्यात आले आणि तेच खुनी म्हणून सांगितले गेले. प्रत्येक वेळी त्यांना अडकवण्यासाठी प्रत्यक्ष साक्षीदार उभे करण्यात आले, प्रत्येक वेळी खुनी पालटले गेले, शस्त्रे पालटली गेली, शस्त्रांचे ‘फॉरेन्सिक लॅब’चे अहवाल वेगवेगळे होते. ठाणे खाडीत शस्त्र शोधण्यासाठी विदेशी यंत्रणा आयात करून त्यावर जनतेचे करोडो रुपये खर्च करण्यात आले. शस्त्राचे सुटे भाग वेगळे करून खाडीत फेकल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे, तर खाडीतील शोधातून पूर्ण पिस्तुल मिळाल्याचा दावा करण्यात आला. हा विनोद नाही, तर अशाच सर्व परस्परविरोधी घटना आरोपपत्रात आहेत. यासंदर्भात तत्कालीन राज्यकर्त्यांनी तपासापूर्वीच गोडसेवादी विचारसरणीच्या लोकांना दोषी घोषित केले होते. या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनी त्याच दिशेने एकांगी तपास केला. त्यातच सत्य जाणण्यापेक्षा काही प्रसिद्धीमाध्यमांनीही ‘मिडिया ट्रायल’ करून तपास भटकवण्यास हातभार लावला. याचा मोठा दुष्परिणाम या अन्वेषणावर झाला. हिंदुत्ववादी संघटनांच्या निष्पाप लोकांना अनेक वर्षे छळ करून कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे

खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकून हिंदूंच्या बदनामीचे षड्यंत्र हे पुस्तक उघड करते ! – रतन शारदा.
हिंदू आणि हिंदुत्व यांवर कोणत्याही पुराव्याविना आरोप करण्यात आले. ‘भगवा आतंकवाद’ म्हणून हिंदूंना लक्ष्य केले जाते. हिंदूच विवेकवादी आहेत. ते चर्चेसाठी नेहमीच सिद्ध असतात; परंतु काही गुन्ह्यांमध्ये हिंदूंना अडकवून हिंदुत्वाची बदनामी करण्याचे षड्यंत्र काहींकडून चालू आहे. बागेश्वरधामविषयी बोलले जाते; परंतु चंगाई सभांद्वारे हिंदूंविरोध कट चालू आहेत, त्यांविषयी मात्र बोलले जात नाही. ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकामध्ये लेखकांनी अत्यंत खोलवर विचार मांडले आहेत. हिंदूंवर वेळोवेळी झालेल्या अन्यायाला या पुस्तकातून वाचा फोडण्यात आली आहे. आम्ही डॉ. अमित थडानी यांच्या पाठीशी आहोत.

       

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.